दुचाकी अपघातात यावलच्या तरुणाचा मृत्यू


A young man from Yawal died in a motorcycle accident यावल (8 फेब्रुवारी 2026) : यावल-रावेर रस्त्यावरील बालाजी इंडस्ट्रीजजवळ झालेल्या दुचाकी अपघातात 25 वर्षीय जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अकिलेश उर्फ गोलू अविनाश कोळी (रा.महाराणा प्रताप नगर, यावल) असे मृताचे नाव आहे.

दुचाकीला धडक दिल्याने अपघात
रविवार, 1 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास अकिलेश हा आपल्या ताब्यातील पल्सर मोटरसायकलने (एम.एच. 19 डि.क्यू.3706) ने रावेरकडून यावलकडे येत असताना यावल शिवारातील बालाजी इंडस्ट्रीजजवळील वळणावर एका अज्ञात वाहन चालकाने आपले वाहन हयगयीने आणि भरधाव वेगाने चालवून अकिलेशच्या दुचाकीला कट मारला. या धडकेमुळे अकिलेश दुचाकीवरून फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली होती.

याप्रकरणी रामदास भगवान कोळी (वय 37) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर अकिलेशवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. मृत अकिलेशच्या पश्चात केवळ त्याची आई आहे.

पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अज्ञात वाहन चालकाचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !