अजितदादा पवारांच्या विमान अपघाताबाबत आमदार अमोल मिटकरींचा धक्कादायक दावा
NCP MLA Amol Mitkari makes a shocking claim regarding Ajit Pawar’s plane accident. मुंबई (8 फेब्रुवारी 2026) : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राजकीय स्तरावरून विविध आरोप सुरूच आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या नव्या दाव्याने खळबळ उडाली आहे. अजितदादा यांना ठार मारण्यासाठी त्यांच्या विमानात सुसाईड बॉम्बर अर्थात आत्मघातकी हल्लेखोराचा वापर करण्यात आल्याचा संशय त्यांनी रविवारी व्यक्त केला.
काय म्हणाले, अमोल मिटकरी
अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना पुन्हा एकदा अजित पवारांच्या निधनावर शंका घेतली आहे. ते म्हणाले, अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या व्हीएसआर कंपनीचे पायलट दोनवेळा बदलण्यात आले होते. ते विमान अगोदरच नादुरुस्त होते. त्याच्यावर एक वर्षापासून बंदी होती. त्यानंतरही अजित पवारांना तेच विमान 28 तारखेला देण्यात आले.
मग प्रत्येक वैमानिकाचा 50 कोटींचा विमा का ?
व्हीएसआर कंपनीने गत डिसेंबर महिन्यात आपल्या कंपनीच्या प्रत्येक वैमानिकाचा प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. जर 50 कोटींचा विमा उतरवला गेला असेल आणि जो पायलट ऐनवेळी बदलण्यात आला अन् त्याला हिप्नोटाईज केले होते का? त्याला आमिष दाखवण्यात आले होते का? अनेक ठिकाणी हिप्नोटाईज करून सुसाईड बॉम्बरचा वापर केला जातो, असे मिटकरी म्हणाले.
पायलटने ’मे डे’चा कॉल का दिला नाही?
अमोल मिटकरी यांनी आपल्या दाव्याखातर राजीव गांधी यांची हत्या व मुंबईवरील हल्ल्याचाही दाखला दिला. ते म्हणाले, अजमल कसाब यालाही दहशतवादी हल्ल्यासाठी पाठवण्यात आले होते. राजीव गांधी यांची हत्या झाली त्यावेळीही असा प्रयत्न झाला होता. त्यामुळे अजित पवारांच्या विमानाच्या पायलटला हिप्नोटाईज करून पाठवले होते का? हा मोठा प्रश्न आहे. कारण, पायलटने ’मे डे’चा कॉल दिला नाही. टेक ऑफ घेतल्यानंतर काही वेळातच पुणे कव्हर करता आले असते, पण पायलटने ते केले नाही त्यामुळे आम्हाला मोठी शंका व्हीएसआर कंपनीवर आहे.


