शिर नसलेल्या पुरूषाचा मृतदेह आढळला : पत्नी चौकशीकामी ताब्यात
Headless body of man found : Wife taken into custody for questioning मुंबई (10 फेब्रुवारी 2026) : शिर नसलेल्या पुरुषाचा छिन्नविछिन्न आणि कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मृताची ओळख पटवली असून, या प्रकरणी त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे. ही घटना मुंबईतील जुहू कोळीवाडा चौपाटीवर घडली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जुहू कोळीवाडा समुद्रकिनार्याजवळ एका संशयास्पद पोत्यातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोते उघडले असता, त्यात एका पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळला. मृतदेहाचे शिर नसल्याने सुरुवातीला ओळख पटवणे कठीण होते मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी केली.
मृताची ओळख आणि पार्श्वभूमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव अनिल गौड (30) असे आहे. अनिल हा गेल्या 29 जानेवारीपासून बेपत्ता होता. तो बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती. 10 ते 12 दिवसांपासून मृतदेह पोत्यात असल्याने तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता.मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि कलम 238 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
पत्नी संशयाच्या भोवर्यात
या भीषण हत्याकांडामागे नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत. प्राथमिक संशयावरून पोलिसांनी अनिल गौड याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घरगुती वाद की अन्य काही कारण, याचा तपास सध्या सुरू आहे. मृतदेहाचे शिर अद्याप सापडलेले नाही, त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.






