तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा : अजितदादांच्या मृत्यूचे सत्य समोर येईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Trust the investigating agencies: The truth about Ajitdada’s death will come out: Chief Minister Devendra Fadnavis मुंबई (11 फेब्रुवारी 2026) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजितदादा पवारांच्या विमान अपघात हा घातपात असल्याचा दावा करीत अनेक मुद्दे मांडले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे सत्य निश्चितच बाहेर येईल, असा ठाम विश्वास करीत आमदार रोहित यांनी त्यांच्याकडील पुरावे तपास यंत्रणांना देण्याचे आवाहन केले.
योग्य तो तपास सुरू
अजित पवार आपल्या सर्वांचे लाडके नेते होते. त्यांच्या निधनाचे सत्य बाहेर यावे, असे प्रत्येकाला वाटते. या प्रकरणी योग्य तो तपास सुरू आहे. सर्वांनी भारतीय तपास यंत्रणांवर विश्वास दाखवला पाहिजे. रोहित पवारांनीही त्यांच्याकडील पुरावे तपास यंत्रणांना दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, मी रोहित पवार काय बोलले हे मी ऐकले नाही. माझ्याकडे जी काही माहिती आहे, त्यानुसार त्यांनी काही प्रेझेंटेशन केले आहे. अजित पवारांच्या मृत्यूविषयी वेगवेगळ्या माध्यमांनी व लोकांनी ज्या शंका उपस्थित केल्यात, त्याच शंका त्यांनी उपस्थित केल्यात.
अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी
फडणवीस म्हणाले, अजित पवार हे आपले महाराष्ट्राचे लाडके व वरिष्ठ नेतृत्व होते त्यामुळे त्यांच्या अपघाताची पूर्ण, सखोल व नीट चौकशी झाली पाहिजे. ही मागणी चुकीची नाही. मीच सर्वप्रथम ही मागणी केली होती. मी या प्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहून या अपघाताची योग्य प्रकारे चौकशी करावी, असे सांगितले होते. त्यावर केंद्रीय नागरी उड्डयण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठीत करून त्यासंदर्भातील पत्रही मला पाठवले आहे. आता ही चौकशी सुरू आहे. मुळातच मला एक गोष्ट अशी वाटते की, यासंदर्भात जी काही चौकशी सुरू आहे ती पूर्ण न होता आपण तर्कवितर्क लढवले तर त्यातून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.
दुर्दैवी मृत्यूचे राजकारण करू नका
अजित पवार आपल्या सर्वांचे लाडके नेते होते. अजित पवारांच्या अपघाती निधनाचे सत्य बाहेर आले पाहिजे, असे प्रत्येकालाच वाटत आहे. ते सत्य निश्चितपणे बाहेर येईल, असा मला विश्वास आहे. यासंदर्भात त्यांचे काही मुद्दे असतील, तर त्यांनी डीजी सेफ्टीकडे पाठवले पाहिजेत. या प्रकरणी डीजी सेफ्टींनी त्यांच्या शंकांचे निरसण केले पाहिजे. एकूणच शंका व्यक्त करणे चुकीचे नाही. फक्त कुठल्याही राजकीय हेतूने याचा उपयोग होणार नाही हे पाहिले पाहिजे. आपण अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूचे राजकारण करणार नाही, या बाबत प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, असेही मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.






