आमदार एकनाथराव खडसेंविरोधात गंभीर गुन्हा : समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण
Serious crime against MLA Eknathrao Khadse : ‘This’ shocking reason has come to light सावदा, ता.रावेर (11 फेब्रुवारी 2026) : सावद्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह राज्यातील मंत्र्यांना शिविगाळ करीत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्याविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
असे आहे प्रकरण
आमदार एकनाथ खडसे हे बुधवार, 11 रोजी दुपारी 12.31 ते 12.45 दरम्यान सावदा पोलीस ठाण्यात आले. यावेळी त्यांनी पोलिसांना रावेरच्या तासखेडा येथील गौण खनिज प्रकरणात गुन्हा का दाखल केला नाही? असा जाब विचारला तसेच सावद्याचे एपीआय विशाल पाटील यांना तुम्ही …. खाता का? अशा अपमानास्पद शब्दात जाब विचारला.

मंत्र्यांना शिविगाळ केल्याचा आरोप
शाब्दिक वाद झाल्यानंतर आमदार खडसेंनी अर्वाच्य भाषा वापरत तुमच्यावर अँटी करप्शनचा ट्रॅप लावतो, असे म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी आमदार खडसे यांनी सावदा पोलिसात दाखल गुन्हा (23/2026) भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) गुन्ह्याच्या संदर्भातील संबंधित महाराष्ट्र शासनाचे मंत्री यांना अश्लील भाषेत शिविगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. एपीआय पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास प्रभारी उपअधीक्षक केदार बारबोले करीत आहेत.
मंत्र्यांना शिविगाळ केली नाही : आमदार खडसे
आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, कुठल्याही मंत्र्यांच्या विरोधात आपण चकार शब्द काढलेले नाही. संबंधिताने राजकीय दबावातून हा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित अधिकार्याची आपण पोलिस प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहोत शिवाय चौकशीला विलंब का करण्यात आला, कामकाज करण्यास टाळाटाळ केल्याने विधानसभेत विशेष अधिकार भंगाची तक्रार करणार असल्याचे आमदार खडसे म्हणाले.
खडसेंनी प्रकरणाची हिस्ट्रीच सांगितली
‘ब्रेकींग महाराष्ट्र’ ला आमदार खडसे यांनी संबंधित प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, तासखेडा ग्रामस्थांनी 50 हजार ब्रास मुरूम चोरी गेल्याची तक्रार दिली होती मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही तर महसूल प्रशासनाने तक्रार द्यावी, असे सूचवण्यात आले व नंतर महसूलकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी आमच्या अखत्यारीतील विषय नाही. त्यांनी पाटबंधारे विभागाच्या जमिनीवरुन गौण खनिज चोरी झाल्याची बतावणी केली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला मात्र अर्जाची चौकशी झालीच नाहीच. मागील विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न मांडल्यानंतर महसूल विभागाकडून उत्तर मिळाले. मोठ्या प्रमाणावर मुरूम चोरी होवूनही अधिकार्यांनी तपास न केल्याने आज आपण संबंधित अधिकार्यांकडे विचारणा केली. यावेळी अधिकार्याने तपासाला अडीच वर्ष लागू शकतात, असे उत्तर दिले. महसूलचे लोक पैसे खातात मात्र आमच्यावर खापर फोडतात, असे ते म्हणाल्यानंतर आपण त्यांना तुम्ही का …. खाता, असे शब्द प्रयोग केला मात्र लागलीच आपण चुकीचा शब्द वापरल्याने माफि मागितली. दोन नंबरच्या धंद्यावर कारवाई का नाही ? तुम्ही त्यांच्याकडून हप्ते घेतात त्यामुळे तुम्हाला एसीबीकडून पकडून द्यावे लागेल, असे देखील आपण म्हणाल्याचे आमदार खडसे यांनी सांगत आपण कुठल्याही मंत्र्यांविषयी एकही शब्द काढल नसल्याचे ते म्हणाले.






