अमळनेर-धरणगाव रस्त्यावर भरधाव बोलेरोच्या धडकेने दोघे ठार
अमळनेर (12 फेब्रुवारी 2026) : अमळनेर ते धरणगाव रस्त्यावर एका भरधाव महिंद्रा बोलेरो पिकअपने दुचाकीला उडवल्याने दोघे जागीच ठार झाले. हा अपघात अमळनेरजवळील बुलढाणा अर्बनच्या गोडाऊनसमोर घडला. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
असा घडला अपघात
अमोल राजू चव्हाण (रा.हनुमान नगर, पारोळा नाका, धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांचे भाऊ नरेंद्र राजू चव्हाण (39) हे आपली मोटरसायकल (क्रमांक एम.एच.19 डी.बी.6679) घेऊन धरणगावकडून येत असताना सोबत नातेवाईक विश्वास रोहिदास सोनवणे (42, रा.भाडणे, ता.साक्री) देखील बसलेले होते.

सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास, अमळनेर-धरणगाव रोडवरील बुलढाणा अर्बन गोडाऊनजवळ समोरून येणार्या एका महिंद्रा कंपनीच्या बोलेरो मॅक्स पिकअप गाडीने (क्रमांक एम.एच.39 ए.डी.3119) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात नरेंद्र चव्हाण आणि विश्वास सोनवणे या दोघांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू ओढवला.
अपघातग्रस्त पिकअप गाडीच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी भरधाव वेगात चालवून दुचाकीला समोरून धडक दिली. या धडकेत मोटरसायकलचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला.
अमोल चव्हाण यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार नामदेव बोरकर तपास करीत आहेत.






