भुसावळ पालिकेच्या सभेला नगराध्यक्षा पाऊण तास लेट : प्रवेशव्दारावर भाजप सदस्यांची मनधरणी
Mayor arrives 15 minutes late for Bhusawal Municipality meeting: BJP members express concern over entry भुसावळ (12 फेब्रुवारी 2026) : पालिकेच्या सन 2026 -27 या वर्षाच्या 327 कोटींची तरतुद असलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा, विनीमय करण्यासाठी मंगळवारी पालिकेत स्थायी सभा घेण्यात आली होती. मात्र दहा पैकी भाजपच्या आठ सदस्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने कोरमअभावी सभा रद्द झाली. रद्द सभा बुधवारी सकाळी 11 पालिकेच्या सभागृहात बोलविण्यात आली. या सभेसाठी भाजपचे आठपैकी सात सदस्य सभागृहात 10.55 वाजता पोहोचले मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व सदस्य तथा गटनेते सचिन चौधरी अनुपस्थित होते. तब्बल पाऊण तास प्रतीक्षा करुन भाजप सदस्यांनी 11.45 वाजता सभागृहातून काढता पाय घेतला. पाच मिनिटांपूर्वीच कॅबीनमध्ये आलेल्या नगराध्यक्षा भंगाळे यांनी सदस्यांना प्रवेशव्दाराजवळच थांबवून सभेस येण्याची विनंती केली. घरी धार्मिक कार्यक्रम तसेच वैद्यकिय कारण देवून भाजप सदस्यांची मनधरणी केल्याने भाजप सदस्यांनी सभेत हजेरी लावली. तब्बल 50 मिनिटे उशिराने म्हणजे 11.50 वाजता सभा सुरु झाली. तासभर चाललेल्या या सभेत भाजपच्या सदस्यांनी प्रशासन व अधिकार्यांना धारेवर धरुन प्रश्नांची सरबत्ती केली.
मुख्याधिकारी गैरहजर
मंगळवारी कोरमअभावी रद्द झालेली सभा बुधवारी नियोजित करण्यात आली. या सभेचा अजेंडा स्थायी समिती सदस्यांना तातडीने व्हॉट्सपव्दारे पाठविण्यात आला होता. स्थायीच्या सभेला प्रभारी मुख्याधिकारी विवेक धांडे यांची अनुपस्थिती होती. त्यांनी या सभेचे अधिकार उपमुख्याधिकारी शे. परवेज अहमद यांना लेखी स्वरुपात दिले होते. मुख्याधिकारी सभेला का नाहीत? याबाबतही भाजप सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला.

अमृत योजनेवर मंथन
स्थायी समितीच्या बैठकीत आरोग्य अभियान स्वच्छ भारत, माझी वसुंधरा या विषयांवर चर्चा झाली. अमृत टप्पा एकच्या कामांचे मागच्या आर्थिक वर्षात बिले अदा केल्याचे अर्थसंकल्पात नमुद केले आहे. दुसरीकडे पाणीपुरवठा अभियंता दीपक चौधरी यांनी एक रुपयाचेही बिल अदा केले नसल्याचे सांगितले. मग अर्थसंकल्पात ते कसे? असा प्रश्न उपस्थित केला. धुरळणी व फवारणीसाठी तरतुद आहे, मात्र हे काम होत नसल्याचाही आरोप यावेळी झाला.
9 सदस्यांची उपस्थिती
स्थायी समितीच्या सभेला नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, शिक्षण समिती सभापती राजेंद्र आवटे, आरोग्य समिती सभापती मेघा वाणी, पाणीपुरवठा सभापती महिमा नागराणी, महिला बालकल्याण समिती सभापती शोभा इंगळे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती अनिता सपकाळे, नगरसेवक गिरीष महाजन, राष्ट्रवादीचे गटनेते सचिन चौधरी यांची उपस्थिती होती तर स्थायीचे सदस्य किरण कोलते अनुपस्थित होते.
लेखापरिक्षकांची स्वाक्षरी नाही
स्थायी समितीच्या बैठकीत आगामी अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. तब्बल 327 कोटींच्या तरतुदीच्या या अर्थसंकल्पावर लेखापरीक्षकांची अद्याप स्वाक्षरी नसल्याचा मुद्दा स्थायी समितीचे सदस्य गिरीष महाजन, राजेंद्र आवटे यांनी उपस्थित केला. जर अधिकार्यांची स्वाक्षरी नसेल तर हा अर्थसंकल्प बनावट आहे काय? याबाबतची शंका त्यांनी उपस्थित केली. यावर उपमुख्याधिकारी परवेज शेख यांनी ते रजेवर असल्याने स्वाक्षरी झाली नसल्याचे नमुद केले. त्यांच्या स्वाक्षरी शिवाय असलेल्या या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी स्थायीची बैठक घेतली कशी असा प्रश्नही गिरीष महाजन यांनी मांडला. मात्र यावर ठोस उत्तर मिळाले नाही.






