जळगावात उपग्रहाच्या मदतीने केळी विमा घोटाळा उघड : गुन्हे दाखल होणार !
Banana insurance scam exposed with the help of satellite in Jalgaon: Crimes will be registered! जळगाव (13 फेब्रुवारी 2026) : शेतात केळीची लागवड केली नसताना लागवड केली असल्याचे दाखवून केळी पिकाच्या विम्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी आता लवकरच गुन्हे दाखल होणार असल्याने बनावट पिक विम्याचा लाभ घेणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. तपासामुळे शेकडो कोटींचा सरकारी निधी वाचला आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील आंबिया बहर हंगामात यंदा केळी पिकासाठी अर्जांची संख्या अचानक वाढल्याने संशय निर्माण झाला. मागील वर्षाच्या तुलनेत 27 हजार 259 अर्ज अधिक दाखल झाले तर विमा संरक्षित क्षेत्र 28 हजार 196 हेक्टरने वाढल्याचे आढळले. ही वाढ नैसर्गिक नसल्याची शंका आल्याने कृषी विभागाने उपग्रह चित्रांच्या आधारे पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. या तांत्रिक तपासणीतूनच प्रत्यक्ष स्थिती समोर आली.

52 हजार हेक्टरवरच लागवड
उपग्रह विश्लेषणानुसार जिल्ह्यात दाखवण्यात आलेल्या 96 हजार 152 हेक्टर विमा संरक्षित क्षेत्रापैकी केवळ 52 हजार 110 हेक्टरवरच केळीची लागवड असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित 44 हजार 41 हेक्टरवर केळी पीक अस्तित्वातच नसल्याचे निष्पन्न झाले. म्हणजेच मोठ्या प्रमाणावर खोटे अर्ज दाखल करून विमा संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले. या निष्कर्षामुळे प्रशासनात खळबळ उडाली.
विम्याची रक्कम जप्त : 217 कोटी वाचले
या बनावट अर्जदारांकडून विमा हप्त्यापोटी जमा झालेले 37 कोटी 43 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. वेळेत तपासणी झाल्यामुळे राज्य सरकारचे 123 कोटी 53 लाख आणि केंद्र सरकारचे 93 कोटी 58 लाख असे मिळून सुमारे 217 कोटी रुपये वाचल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईमुळे संभाव्य मोठे नुकसान टळले असल्याचे अधिकार्यांनी नमूद केले.
गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश
या प्रकरणी बनावट अर्जदारांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात केळी पिकाचा विम्यात मोठा वाटा असल्याने अशा प्रकारचे गैरप्रकार वारंवार समोर येत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे पुढील काळात तपासणी अधिक काटेकोर करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.






