जळगावात भरधाव डंपरने प्रौढाला चिरडले : संतप्त जमावाकडून वाहनावर दगडफेक
An adult was crushed by a speeding dumper in Jalgaon: Angry mob pelted stones at the vehicle जळगाव (14 फेब्रुवारी 2026) : वाळू वाहतूक करणार्या भरधाव डंपरने जळगावातील वयोवृद्धाला चिरडल्याची संतापजनक घटना शुक्रवारी दुपारी कालिका माता चौकात घडली. या अपघातानंतर संतप्त जमावाने वाहनावर दगडफेक करीत या भागात सीसीटीव्ही लावण्यासह वाहतूक पोलिसांची मागणी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला. प्रभाकर रघुनाथ पाटील (56, मूळ रा.तेली चौक, जुने जळगाव, ह.मु.ज्ञानदेवनगर, जळगाव) असे मृताचे नाव आहे.
डंपर चालक मोबाईलमध्ये गुंग
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर पाटील हे बाजारातून भाजीपाला घेऊन आपल्या घराकडे जात असताना कालिंका माता चौकात मोबाईलवर बोलण्यात व्यस्त भरधाव डंपर चालकाने धडक दिली व डंपरचे चाक थेट पाटील यांच्या तोंडावरून गेले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

जमावाचा उद्रेक आणि दगडफेक
अपघाताची बातमी वार्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पापाचा बळी गेल्याने जमावाचा संयम सुटला. संतप्त नागरिकांनी डंपरच्या काचा फोडल्या आणि वाहनाचे मोठे नुकसान केले. काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
नागरिक संतप्त : सीसीटीव्हीसह वाहनांवर हवे नियंत्रण
भीषण अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. चौकात तत्काळ आधुनिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, या चौकात 24 तास वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, रहिवासी भागात डंपरसारख्या अवजड वाहनांच्या वेगावर मर्यादा आणावी, अशा मागण्या नागरिकांकडून करण्यात आल्या. पोलिसांनी डंपर चालकावर कारवाई करण्याचे यावेळी आश्वासन दिले.






