भुसावळातून महागडी कार लांबवली : अमरावतीतील दोघांना बेड्या
एक लाख 50 हजारांची कार जप्त ; संशयीताची पोलीस कोठडीत रवानगी
Expensive car stolen from Bhusawal : Two arrested in Amravati भुसावळ (15 फेब्रुवारी 2026) : भुसावळ शहरातील पालखी हॉटेल मागील परिसरातून इको कार लांबवल्याप्रकरणी अमरावती येथील दोघांना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
असे आहे कार चोरी प्रकरण
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात सिसिटीएनएस गुन्हा क्रमांक 539/2026 अन्वये भा.न्या.सं. कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. फिर्यादी डेनिस जोसेफ रोडरिक्स (54, रा. पालखी हॉटेल मागे, वरणगाव रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11.30 ते 23/12/2025 रोजी सकाळी सात या वेळेत त्यांच्या घरासमोर उभी असलेली एक लाख 50 हजार रुपये किंमतीची मारुती सुझुकी कंपनीची ग्रे रंगाची इको (कार एम.एच.15 जी.एफ.4457) कार अज्ञात चोरट्याने लांबवल्याने 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10.45 वाजता गुन्हा नोंदविण्यात आला होता.

दोघा आरोपींना अटक
तपासादरम्यान वाडा येथील पोलीस अधिकार्यांकडून माहिती मिळाल्यानंतर आरोपी बादशाहसिंग अजब सिंग टाक (43, रा.वडाळी, रेल्वे स्टेशनजवळ, अमरावती) व राजेंद्रसिंग महिपालसिंग बावरी (32, रा.सदगुरू नगर, अमरावती) यांना 13 रोजी रात्री 10.57 वाजता अटक करण्यात आली.
आरोपींकडून चोरीस गेलेली इको कार जप्त करण्यात आली असून पुढील तपास हवालदार विजय बळीराम नेरकर करीत आहेत. आरोपींकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी न्यायालयाकडे दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आल्याने ती मंजूर करण्यात आली.







