भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत जळगावात दुचाकीस्वार ठार
A bike rider was killed in a collision with a speeding Mahindra pickup in Jalgaon जळगाव (15 फेब्रुवारी 2026) : भरधाव महिंद्रा वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शिरसोलीकडून वावडदाकडे जाणार्या रस्त्यावर नेवरा मारुती मंदिराजवळ घडला. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जगदीश अशोक पाटील (37, रा.शिरसोली प्र.बो.) असे मृताचे नाव आहे.
भरधाव वाहनाची दुचाकीला धडक
जगदीश पाटील हा युवक 14 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी.डी.1165) ने शिरसोलीकडून वावडदाकडे जात असताना भरधाव महिंद्रा कंपनीच्या वाहनाने (क्रमांक एम.एच.20 ई.जी.6529) ने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, जगदीश पाटील यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर संबंधित वाहनचालक मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरून पसार झाला मात्र गावकर्यांनी पाठलाग करून नायरा पेट्रोल पंपाजवळ वाहन अडवले. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक अनिल वसंत पवार आणि इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जगदीश यांना तातडीने रुग्णवाहिकेने जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

या प्रकरणी अनिल पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनमध्ये महिंद्रा वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.







