जळगावात दगडाने ठेचून प्रौढाची हत्या : दोघांना अटक
जळगाव (16 फेब्रुवारी 2026) : जळगावात प्रौढाची दगडाने ठेचून हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अमर वसंत सपकाळे (वय 50, रा.खंडेराव नगर, जळगाव) असे खून झालेल्या मयताचे नाव आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे खून प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अमर सपकाळे आणि संशयित आरोपी मोहित विजय पाटील आणि कल्पेश सुतार (दोन्ही रा.पिंप्राळा, जळगाव) यांच्यात कुठत्यातरी जुन्या किंवा किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी रागाच्या भरात जळगाव ते भुसावळ दरम्यान असलेल्या रेल्वे रुळावर अमर सपकाळे यांना गाठले आणि त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांना जिवे ठार मारले. ही घटना 14 फेब्रुवारीच्या रात्री 8 ते 15 फेब्रुवारीच्या सकाळी 8 वाजेच्या दरम्यान घडली.

दोघा आरोपींना अटक
रविवार, 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता अमर सपकाळे यांचा मृतदेह खंडेराव रेल्वे रूळावर मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मयत अमर सपकाळे यांचा मुलगा गिरीश अमर सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मोहित विजय पाटील आणि कल्पेश सुतार (दोन्ही रा. पिंप्राळा, जळगाव) यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रनशिवरे करीत आहे.







