भुसावळ एमआयडीसीतील अवैध मुरुम उत्खनन ; मुख्य माफियांवर गुन्हे दाखल न झाल्यास आंदोलन
रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांचे तहसीलदारांना निवेदन
भुसावळ (18 फेब्रुवारी 2026) : भुसावळ तालुक्यातील किन्ही व कन्हाळे बुद्रुक परिसरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करावेत,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला.
काय आहे निवेदनाचा आशय
निवेदनात नमूद केले आहे की, एमआयडीसीच्या जळगाव उपविभागावर 47 लाख 32 हजार 240 रुपयांचा दंड व एका डंपरवर 2 लाख 39 हजार 230 रुपयांची कारवाई केवळ दिखाऊ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मुरुम चोरी करणारे कंत्राटदार, जेसीबी व पोकलेन मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने मोजलेले 397 ब्रास उत्खनन संशयास्पद असून ड्रोन किंवा डीजीपीएसद्वारे पुनर्मोजणी करावी, संबंधित कंत्राटदारांचे मटेरियल ऑडिट करावे, बिले रोखून काळ्या यादीत टाकावे तसेच अवजड यंत्रसामग्री जप्त करावी, अशी मागणीही करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा नेते दिनेश इखारे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, जिल्हा महासचिव वंदना आराक, जिल्हा उपाध्यक्ष देवदत्त मकासरे, बंटी नरवाडे, स्वप्नील सोनवणे, बंटी सोनकांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 10 दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा विनोद सोनवणे यांनी दिला आहे.







