20 लाखांसाठी मामा-भाच्याचे अपहरण : अवघ्या काही तासात आरोपी जळगाव पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव (18 फेब्रुवारी 2026) : 20 लाखांच्या खंडणीसाठी मोबाईल विक्रेत्या मामासह भाच्याचे अपहरण करण्यात आले मात्र शनिपेठ पोलिसांनी अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
असे आहे प्रकरण
फिर्यादी कृष्णकुमार डुंगराराम चौधरी (32) हे मोबाईल साहित्याचे विक्रेते आहेत. 15 फेब्रुवारी रोजी आरोपी यश जितेंद्र माकोडे (22, रा. जळगाव) याने फिर्यादीचा भाचा गणपतलाल माली (19) याला ममुराबाद रोडवरील एका घरात डांबून ठेवले. त्यानंतर, आरोपीने फिर्यादी कृष्णकुमार यांना स्वतःच्या मोटारसायकलवर बसवून अकोला येथे नेले. तिथे त्याचा साथीदार युवराज गणेश पवार (वय 24) याच्या मदतीने फिर्यादीला डांबून ठेवत, जिवे मारण्याची धमकी देऊन 20 लाख रुपयांची खंडणी मागितली.

ऑनलाईन खंडणी आणि धमकी
आरोपींनी फिर्यादीकडून सुरुवातीला 15 हजार रुपये ‘गुगल पे’द्वारे स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर आरोपींनी भाच्याला अकोल्यात डांबून ठेवले आणि कृष्णकुमार यांना 20 लाख रुपये घेऊन येण्यासाठी जळगावला पाठवून दिले. जळगावला परतताच फिर्यादीने तत्काळ शनिपेठ पोलीस स्टेशन गाठून आपबिती सांगितली.
पोलिसांची गतिमान कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. अकोला एलसीबीचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्याशी संपर्क साधून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचे लोकेशन शोधले. जळगाव आणि अकोला पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताथोड नगर (अकोला) येथील घरातून गणपतलाल याची सुखरूप सुटका केली.
या कारवाईत पोलिसांनी यश माकोडे, युवराज पवार आणि एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी मोहीम राबवण्यात आली. संशयित आरोपींना पुढील कारवाईसाठी शनीपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.







