विमान अपघाताबाबत जय पवार म्हणाले : ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही !
व्हीएसआर कंपनीच्या विमानांवर बंदी घालण्याचीही मागणी
Regarding the plane crash, Jai Pawar said: The black box cannot be destroyed easily! पुणे (19 फेब्रुवारी 2026) : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर या संदर्भात विविध दावे सुरू असतानाच आता त्यांचे पुत्र जय पवार यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली. विमान अपघातात ब्लॅक बॉक्स इतक्या सहजासहजी नष्ट होऊ शकत नाहीत, असे तांत्रिक मुद्यावर भाष्य करत त्यांनी या चर्चांना उत्तर दिले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून व्हीएसआर कंपनीच्या विमान उड्डाणांवर तात्काळ बंदी घालण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
व्हीएसआर कंपनीवर आणावी बंदी
जय पवार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले की, विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणार्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे तसेच व्हीएसआरला तत्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालून त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे, अशी मागणी जय पवार यांनी केली आहे.

गंभीर गैरव्यवहारांची हवी चौकशी
अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या घटनेचे पारदर्शक सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमान उड्डाणांवर तात्काळ बंदी घालण्याची आणि विमानांच्या देखभालीतील संभाव्य गंभीर गैरव्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्यावर जय पवार यांची भूमिका रोहित पवारांच्या मागणीशी सुसंगत असल्याचे पाहायला मिळत आहे.







