!-- afp header code starts here -->

हॉटेलवर नेण्याच्या बहाण्याने महिलेला डोंगरावर नेत केला खून : सहा आरोपींना अटक


Woman killed by taking her to a mountain on the pretext of taking her to a hotel: Six accused arrested पुणे (19 फेब्रुवारी 2026) : रिक्षाला हात दिल्यानंतर महिलेला हॉटेलवर सोडण्याऐवजी नराधमांनी तिला डोंगरावर नेले मात्र महिलेने यावेळी वाद केल्यानंतर आरोपींनी तिचा खून केला. पोलिसांनी 97 फुटेज व 35 वाहनांची पाहणी केल्यानंतर खुनाचा उलगडा करीत सहा आरोपींना अटक केली.

या आरोपींना अटक
केशव कमलेश चौधरी (20), सोन्या लक्ष्मण पवार (19), अब्दुल महंमद शेख (23, तिघे रा.भारतनगर, कात्रज ), महादेव अर्जुन व्होरडे (21), साई अमित पुजारी (22), सोहेल हनीफ खान (20, सर्व रा. कात्रज) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सहायक पोलिस निरीक्षक समीर शेंडे (40) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

असे आहे खून प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, 10 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास रासकर पार्क, मांगडेवाडी, कात्रज येथील क्रशर खाणीमध्ये एका महिलेचा मृतदेह मिळून आला होता. शवविच्छेदन अहवालात महिलेचा खून झाल्याचे समोर आले. शवविच्छेदन अहवालात महिलेचा चोवीस तास आधी मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी चर्चा केली, तेव्हा हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळापासून चारही बाजूला तीन किमी परिसरातील तसेच महिला वास्तव्यास असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी केली. 97 टार्गेटेड फुटेज एकत्र करून त्यातील संशयित 35 वाहने निवडली. त्यातील प्रत्येक वाहनचालकांची कसून चौकशी केली.

अखेर रिक्षा चालक हाती
पोलिसांच्या हाती भारतनगर कात्रज परिसरात वास्तव्यास असलेला रिक्षा चालक केशव चौधरी लागला. त्याने आपल्या रिक्षाच्या हूडमध्ये बदल केल्याचे दिसून आल्याने पोलिसांचा अधिक संशय त्याच्यावर बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच चौधरीने तोंड उघडले. त्याने पोलिसांना या घटनेबाबत माहिती देताना, महिलेने रिक्षाला हात केला. त्यावेळी अगोदरच माझ्या रिक्षात त्याचे नशेडी मित्र अब्दुल आणि सोनू होते. महिला रिक्षात बसल्यानंतर तिने कात्रज येथील सृष्टी हॉटेल येथे सोडण्यास सांगितले.

मात्र तिघेजण या महिलेला शॉर्टकटचा बहाणा सांगून मधल्या रस्त्याने मांगडेवाडी येथील डोंगरात घेऊन आले. काही वेळाने इतर तिघे आरोपी देखील तिथे आले. त्यावेळी रात्रीचे दहा वाजले होते. महिलेसोबत त्यांचा वाद झाला. वादातून आरोपींनी महिलेला अगोदर लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर खाणीच्या खोल दरीत ढकलून देऊन ठार मारले. दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत खुनाच्या घटनेचा छडा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या.

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
सोनू पवार याच्यावर यापूर्वी पुणे ग्रामीण हद्दीत खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर, अब्दुल शेख याच्यावर जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केली.

 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !