थाळनेर पोलिसांची मोठी कामगिरी : बसमधून गांजा वाहतूक करणार्या मुंबईच्या आरोपीला बेड्या
86 हजारांचा गांजा जप्त : सावेर गावाच्या शिवारात कारवाई
Thalner police’s big achievement : Mumbai accused of transporting ganja in bus arrested थाळनेर (20 फेब्रुवारी 2026) : थाळनेर पोलिसांनी बसमधून गांजाची वाहतूक करणार्या मुंबईच्या आरोपीला अटक केली असून त्याच्या ताब्यातून 86 हजार रुपये किंमतीचा दहा किलो गांजा जप्त करण्यात आला. मुस्तफा जिलानी शेख (36, रा.रूम नंबर 426, जनता कॉलनी, गिलबर्ट टेकडी गांवदेवी डोंगरी, मोहम्मदी मस्जिदजवळ, अंधेरी पश्चिम, मुंबई) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरुन कारवाई
थाळनेर प्रभारी सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील यांना शिवाई बसमधून संशयीत गांजाची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने गुरवार, 19 रोजी 11.30 वाजता सापळा रचला. शिरपूर-चोपडा रस्त्यावरील सावेर गावाच्या शिवारातील जय पेट्रोलपंपाजवळ जळगाव-शिरपूर बस आल्यानंतर तिची तपासणी करून मिळालेल्या वर्णनानुसार संशयीताला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याच्या बॅगेची झडती घेतल्यानंतर त्यात 86 हजार 320 रुपये किंमतीचा 10 किलो गांजा आढळल्याने तो जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर प्रभारी हेमंत पाटील, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, हर्षल पाटील, दिनेश महाले, रावसाहेब पाटील, उमाकांत वाघ, अनिकेत साळुंखे, रवींद्र मोरे, रामकृष्ण बोरसे, दिलीप मोरे आदींच्या पथकाने केली.







