जरंडीत सावकाराचा जाच असह्य : शेतकर्याने मृत्यूला कवटाळले
सोयगाव (20 फेब्रुवारी 2026) : खाजगी सावकाराने व्याजाचे चार पट पैसे घेऊनही पुन्हा वसुलीचा तगादा लावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या अल्पभूधारक कर्जबाजारी शेतकर्याने खिशात चिठ्ठी लिहून गळफास घेत जीवन संपवली. ही धक्कादायक घटना गुरुवार, 19 रोजी साडेदहा वाजेच्या सुमारास जरंडी येथे घडली. दत्तात्रय रघुनाथ मुठ्ठे (61) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
अल्पभूधारक असलेल्या मुठ्ठे या शेतकर्याकडे जरंडी शिवारात दोन एकर शेती आहे. शेतीच्या मशागत आणि पेरणीसाठी त्यांनी बँका आणि खाजगी सावकाराकडून एकूच पाच लाख रुपये कर्ज घेतले मात्र सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम फेडण्यासाठी त्यांनी त्यांची शेतजमीन विकून कर्जाची व्याजासह चार पट रक्कम परत दिली मात्र त्यानंतरही सावकाराची भूक भागत नसल्याने सावकार त्यांना मानसिक त्रास देत होता व हा प्रकार शेतकर्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत नमूद केला आहे.

दरम्यान, शेतजमीन विक्री करून त्यांनी सावकारी कर्जाची परतफेड केली व उर्वरित दोन एकर शेती त्यांनी पिकविण्यासाठी ठेवली परंतु संबंधित खासगी सावकार हा उर्वरीत शेती विकून मला पैसे दे, असे फोनवरून वारंवार त्रास देत असल्याने दत्तात्रय मुठ्ठे यांनी पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेतला व वरील सर्व वर्णन चिठ्ठीत लिहून ठेवले.
घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. मृताच्या खिशात सापडलेली ती चिठ्ठी व मोबाईल पोलिसांनी जप्त केला. सोयगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन डॉ.शैलेश खंदारे यांनी केले. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत शेतकर्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. तपास पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक गजानन आरेकर, अजय कोळी, गजानन दांडगे आदी करत आहे.







