50 हजारांची लाच भोवली : परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात


Bribe of Rs 50 thousand: Controversial Tehsildar of Parli Venkatesh Munde in the net of ACB परळी (21 फेब्रुवारी 2026) : 50 हजारांच्या लाच मागणी प्रकरणी परळीतील वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना एसीबीने अटक केल्याने महसूल वर्तुळातील लाचखोर हादरले आहेत. ऐपत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल 50 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. सुरुवातीला 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली मात्र तडजोडीनंतर 20 हजार रुपयांवर व्यवहार ठरला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने प्राथमिक पडताळणी करून नियोजनबद्ध सापळा रचला. तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली मात्र एसीबीने आवश्यक पुरावे संकलीत केले. संबंधित अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सामान्यांकडून स्वागत सुरू
पुढील तपास बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. या घटनेमुळे परळी तालुक्यातील महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. जिल्हाभर या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. सामान्य नागरिकांकडून भ्रष्टाचाराविरोधातील या धडक कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकवण्यासाठी अशा कठोर पावले आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील पुढील घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दमानियांनी केले होते आरोप
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर राज्यभर राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. यावेळी अंजली दमानिया यांनी तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ना-ना आरोप केले होते. त्यानंतर एक ट्विट करून बीड जिल्ह्यातले काही अधिकारी धनंजय मुंडे यांच्यासाठी काम करत असल्याचा आरोप केला होता. त्या अधिकार्‍यांच्या यादीमध्ये व्यंकटेश मुंडे यांचेही नाव होते. भगवान बाबांच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा दुरुपयोग करून काही राजकीय नेते आणि वाल्मिक कराड सारखी माणसे, या समाजाला बदनाम करत आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या मर्जीतील याच समाजातील माणसं परळी येथे सगळ्या पदांवर घेतल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !