कार-ट्रकच्या भीषण अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू
Seven people tragically died in a horrific car-truck accident वलसाड (21 फेब्रुवारी 2026) : भरधाव कार व ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याने सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमधील सर्व आंबा जंगल परिसरातील एकाच कुटुंबातील सदस्य असल्याचे समोर आले. या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील कपराडा येथील कुंभ घाटाजवळ घडला.
एकाच कुटुंबावर काळाचा घाला
आंबा जंगल परिसरात राहणारे एक कुटुंब कारने कपराडा येथून नानापोढाच्या दिशेने जात होते. कार कुंभ घाटाजवळ आली असता, समोरून येणार्या भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. कारमधील सात जणांनी जागीच प्राण सोडले, तर एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
परिसरात शोककळा, घटनास्थळी लोकांची गर्दी
अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे दृश्य इतके भयानक होते की उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. कारचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. या घटनेची माहिती मिळताच कपराडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाहतूक कोंडी आणि पोलीस तपास
या भीषण अपघातानंतर कुंभ घाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.. पोलिसांनी सात जणांच्या मृत्यूला अधिकृत दुजोरा दिला.







