खासदार राऊतांची दिलगिरी अन् मंत्री दादा भुसेंची दिलजमाई : अब्रुनुकसानीचा खटला अखेर मागे


MP Raut’s apology and Minister Dada Bhuse’s heartfelt condolences : Defamation case finally over मालेगाव (21 फेब्रुवारी 2026) : 178 कोटी रुपयांच्या कथित शेअर्स घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा खटला दाखल करण्यात आला होता. शनिवारी या खटल्या संदर्भात मालेगावात आलेल्या खासदार संजय राऊत यांनी माध्यम व न्यायालयापुढे दिलगिरी व्यक्त केली. न्यायालयीन प्रक्रियेनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र येत माध्यमांशी संवाद साधला आणि वादावर पडदा टाकल्याची घोषणा केली.

चुकीच्या माहिती आधारे आरोप केल्याचा दावा
खासदार संजय राऊत यांनी न्यायालयात आणि माध्यमांसमोर स्पष्ट शब्दांत दिलगिरी व्यक्त केली. चुकीच्या माहितीच्या आधारे आपण मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केल्याचे त्यांनी मान्य केले. आम्हा दोघांना न्यायालयाने पहिले, विषय आता संपला आहे, असेही त्यांनी सांगितले. आपल्याला मिळालेली माहिती चुकीची होती आणि त्यातून गैरसमज निर्माण झाला, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मालेगावच्या शेतकर्‍यांची माफी मागत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.


भुसेंनी मागे घेतला दावा
दादा भुसे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आपण अब्रुनुकसानीचा दावा मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मालेगावच्या शेतकर्‍यांचा आणि नागरिकांचा संभ्रम, तसेच त्यांच्या भावना लक्षात घेता हा विषय वाढवण्यापेक्षा संपवणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. हा विषय आता संपला आहे, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी नमूद केले.

काय आहे नेमके प्रकरण ?
वादाची पार्श्वभूमी178 कोटी रुपयांच्या कथित शेअर्स घोटाळ्याशी संबंधित होती. संजय राऊत यांनी सामाजिक माध्यमांवर हा आरोप केला होता. दादा भुसे यांनी तो आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत आधीच स्पष्टीकरण दिल्याचे नमूद केले. संबंधित सर्व पैसे आर्मस्ट्राँग कंपनीकडे ट्रान्सफर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तरीही आरोप मागे घेतले गेले नाहीत, म्हणूनच मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.

अद्वय हिरे यांनी चुकीची माहिती दिली
यावेळी दादा भुसे यांनी सांगितले की, काही व्यक्तींनी चुकीची माहिती पसरवून हा वाद निर्माण केला. ज्यांच्याकडून माहिती आली तेही आता दुसर्‍या पक्षात गेले असल्याचे सूचक विधान करण्यात आले. अद्वय हिरे यांनी चुकीची माहिती दिल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले मात्र राऊत यांनी स्वतः आरोप मागे घेतल्याने आणि खोटेपणा मान्य केल्याने पुढील कारवाईची गरज उरली नसल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.

वाद वाढवण्यापेक्षा संपवणे योग्य
संजय राऊत यांनीही दादा भुसे आणि माझे चांगले संबंध आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे म्हणत विषयाला मैत्रीपूर्ण शेवट दिला. राजकीय भूमिका वेगळी असली तरी वैयक्तिक पातळीवर संवाद आणि समज कायम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सत्ता पक्षात दोघेही वेगवेगळ्या टप्प्यांवर असले तरी वाद वाढवण्यापेक्षा संपवणे योग्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !