राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली
Senior NCP leader Sharad Pawar’s health deteriorates again पुणे (22 फेब्रुवारी 2026) : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा काहीशी बिघडली असून अशक्तपणामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.शरद पवार यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आली. सध्या त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली निरीक्षणाखाली आहेत.
पवारांवर दोन दिवस होणार उपचार
रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, शरद पवार यांना आज सौम्य डिहायड्रेशनमुळे रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना द्रवपदार्थांची आवश्यकता आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते दोन दिवस रुबी हॉल क्लिनिकमध्ये राहतील आणि नंतर त्यांना घरी पाठवण्यात येईल.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. आम्ही बाबांना पुन्हा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केले आहे. त्यांना हायड्रेशनचा त्रास होत होता. त्यासोबतच त्यांच्या काही टेस्ट बाकी असल्याने त्यांना आम्ही रुग्णालयात दाखल करत आहोत. बाबांवर उपचार करणार्या सर्व डॉक्टरांचे खूप खूप आभार, असेही सुप्रिया सुळेंनी त्यांच्या व्हॉटस्अॅप स्टेटसद्वारे म्हटले आहे.
दुसर्यांदा रुग्णालयात दाखल करण्याची वेळ
काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी रुबी हॉल रुग्णालयात पाच दिवस उपचार घेतले होते. त्यावेळी शरद पवारांना छातीत संसर्ग झाल्याने त्यांना खोकला आणि कफचा त्रास जाणवत होता. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. सर्व तपासण्यांचे अहवाल समाधानकारक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या ऑक्सिजनची पातळी आणि इतर जीवनावश्यक निकष सामान्य मर्यादेत असल्याचेही सांगण्यात आले होते.
प्रकृतीत सुधारणा झाल्याने पाच दिवसानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते आणि ते पुण्यातील निवासस्थानी विश्रांती घेत होते मात्र आज पुन्हा अशक्तपणा वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.






