ज्या घरात ज्येष्ठांचा सन्मान तेथे असतो सुखाचा अधिवास
कीर्तन महोत्सव : भुसावळच्या पद्मावती नगरात राजेंद्र महाराज कासोदेकरांचा सल्ला
भुसावळ (23 फेब्रुवारी 2026) : कीर्तन म्हणजे केवळ टाळ-मृदंगाचा गजर नव्हे, तर अंत:करणातील शुद्धीचा मार्ग आहे. आई-वडीलांची सेवा हीच खरी पंढरीची वारी आहे असा मोलाचा सल्ला राजेंद्र महाराज कासोदेकर यांनी येथे दिला.
भुसावळच्या वरणगाव रोडवरील पद्मावती नगर येथे बिजासनी माता प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या निमित्ताने तीन दिवस कीर्तन महोत्सव घेण्यात आला. त्यात तृतीय विचारपुष्प गुंफत असताना ते बोलत होते. कीर्तन महोत्सव पांडुरंग ओंकार पाटील, अलका पाटील, पवन पाटील आणि रहिवाशांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. त्यात राजेंद्र महाराज म्हणाले, संतांचे विचार आचरणात आणणे हीच खरी पांडुरंगाची भक्ती आहे. काळ बदलला तरी नितीमत्ता बदलवू नका. ज्या घरात ज्येष्ठांचा सन्मान होतो, तिथेच सुखाचा वास असतो. माणूस म्हणून जन्माला आल्यावर ईश्वराची भक्ती आणि माणुसकीची जपणूक करणे हेच मानवाचे आद्य कर्तव्य आहे. महोत्सवात गायनाचार्य रामकृष्ण महाराज, मृदंगाचार्य हर्षल महाराज यांनी साथसंगत केली.
कुलदेवतेची आराधना करा
जीवनात दान-धर्म करताना हात आखडता घेऊ नका. वायफळ खर्च टाळून कीर्तन महोत्सव, सप्ताह आयोजित करा. जेथे किर्तनाची जागा तेथे पांडुरंग असतो. संस्कृतीची जोपासना करा. ज्या घरात कुलदेवतेची आराधना व कुळाचार मनोभावे केला जातो तेथे प्रगती होते. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सण आणि उत्सवातून एकसंध व्हा असा संदेश या किर्तनातून देण्यात आला.
विठ्ठल नामात मन:शांती
गतिमान कालचक्रात माणूस यंत्र बनला आहे. साधना, आराधना करायला वेळ नाही असं रडगाणे गायिले जाते. मात्र आजच्या धावपळीच्या युगात मन:शांती हवी असेल तर विठ्ठल नामाचा आधार घ्यावा. पालकांनी तरुण पिढीत प्रचंड वाढत चाललेली व्यसनाधीनता आणि सोशल मीडियाचा अतिवापर याकडे लक्ष द्यावे. माणसाने नितीने वागावे आणि श्रमाने कमवावे.
काला आनंदाचा परमोच्च बिंदू
काल्याचे कीर्तन हे प्रसादाचे असते. ते श्रवणाचा लाभ होणे हा आनंदाचा परमोच्च बिंदू आहे. नटखट बालकृष्णाच्या लिला ऐकताना माणूस हरकून जातो. पालकांनी आपल्या परिसरात होणाऱ्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला मुलांना जरुर न्यावे. आयुष्यात पैसा कमवताना आपली मुलं घडवण्याकडेही लक्ष द्यावे. देवीचा जागर करताना नवचेतना आणि ऊर्जा मिळते. तिची रुपे अनेक आहेत. चराचरात तिचा अधिवास आहे. मनोभावे सेवा केल्याचे गोड फळ नक्कीच मिळते असे राजेंद्र महाराज काल्याच्या कीर्तनात म्हणाले.