वरणगावातील समस्या तातडीने मार्गी लावा : नगराध्यक्ष सुनील काळेंची जिल्हा समन्वय समितीच्या सभेत मागणी
Resolve the problems in Varangaon immediately: Mayor Sunil Kale’s demand at the District Coordination Committee meeting वरणगाव (23 फेब्रुवारी 2026) : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शहरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले.
समस्या सोडवण्याची मागणी
सिद्धेश्वर नगरातील रेल्वे पुलाची गंभीर समस्या असल्याबाबत काळे यांनी लक्ष वेधले. रेल्वे पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा,, अशी मागणी नगराध्यक्षांनी केली.


वरणगाव वेल्हाळे राख बंडातील बंद असलेले ट्रॅक्टर त्वरित सुरू करा
वेल्हाळे राख बंड परिसरातील बंद पडलेले ट्रॅक्टर योग्य तो मार्ग काढून तातडीने सुरू करण्यात यावेत, जेणेकरून स्थानिक नागरिकांना व कामगारांना होणारा त्रास दूर होईल तसेच सिद्धेश्वर नगरातील अतिक्रमण कायम करून घरकुल मोजणी फी विशेष बाब म्हणून जिल्हा प्रशासनाने भरावी तसेच नगरपरिषदेला निधी तातडीने देण्यात यावा, वरणगावच्या पवन नगरात पाईप लाईन टाकण्यासाठी आयुध निर्माणीची परवानगी देऊन भोगावती नदी सुशोभित करावी, तिरंगा सर्कल ते प्रभात फेरी मार्गात अडथळा ठरणारे पोल स्थलांतर करून दरम्यान वीज वाहिनी भूमिगत करावी, अशी मागणी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली.
तत्काळ कार्यवाहीचे निर्देश
नगराध्यक्ष काळे यांनी नागरिकांना होत असलेल्या अडचणींची सविस्तर माहिती देत संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी ठाम भूमिका मांडली. अध्यक्षस्थानावरून केंद्रीय राज्यमंत्री यांनी संबंधित व इतर विभागातील अधिकार्यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, असे आदेश देण्यात आले.