आमदार रोहित पवार यांचा पुन्हा दावा ; अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही !
मुंबई (24 फेब्रुवारी 2026) : अजितदादांचा अपघात हा अपघात नसून घातपात असल्याचा खळबळजनक दावा त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तपासातील ‘व्हीसआर’ कंपनीच्या रेकॉर्डबाबत त्यांनी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. विमानाच्या रेकॉर्डमध्ये मोठी बनवाभबनवी सुरू असून यंत्रणांची एकमेकांशी मिलीभगत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी सोशल मीडियातील पोस्टद्वारे केला आहे.
पाच जणांचा अपघाती मृत्यू
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले होते. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी चौकशीची मागणी लावून धरली आहे.

काय म्हणाले रोहित पवार?
अजित दादांच्या अपघातातील विमानाच्या चौकशीच्या निमित्ताने रोहित सिंगला काल पायलट म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती मिळत अराहे. व्हीएसआर कंपनीकडे विमानाच्या 5000 तासांपैकी केवळ 1800 ते 2000 तासांचा रेकॉर्ड उपलब्ध असून उर्वरित 3000 तासांचे रेकॉर्डस उपलब्धच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी, बनवाबनवी व्हीएसआरला करता यावी यासाठी चौकशी जाणूनबुजून लांबवली जात आहे का? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचा दावा
डीजीसी व व्हीएसआर यांची मिलीभगत, यंत्रणांचा एकमेकांशी असलेला विसंवाद बघता, अजित दादांची यांच्या लेखी किती किंमत आहे हे कळून चुकले. केंद्र आणि राज्य सरकार थोडे गांभीर्य दाखवेल, अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी व्यक्त केली. यापूर्वीही रोहित पवार यांनी पत्रकार परिषदा घेऊन ब्लॅक बॉक्सची माहिती, अपघातग्रस्त विमानाच्या कंपनीच्या मालकाची माहिती, त्यांना असलेले कथित राजकीय वरदहस्त याबाबत त्यांनी सातत्याने चर्चा केली आहे. त्यांच्या मते या विमानाची एकूण क्षमता पाच हजार तास उडण्याची होती. जेव्हा अजित पवारांना हे विमान देण्यात आले, तेव्हा त्याची क्षमता संपत आली होती. केवळ 10-15 तास शिल्लक होते त्यामुळे असे विमान अजित पवारांना दिलेच नव्हते पाहिजे. तसेच हे विमान आठ हजार तासांहून अधिक काळ उडवले गेल्याची शक्यता असल्याचे रोहित पवारांनी वर्तवली होती. त्यातच, आता त्याचा रेकॉर्डच उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.