महाशिवपुराण कथा : भुसावळकडून रावेरकडे जाणारी अवजड वाहतूक 10 ते 16 मार्चपर्यंत राहणार बंद !

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचे नियोजन : अधिकार्‍यांची पाहणी


Mahashivpuran Katha : Heavy traffic going from Bhusawal to Raver will be closed from March 10 to 16! भुसावळ (25 फेब्रुवारी 2026) :  पं. प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा यावल तालुक्यातील अकलूद शिवारात 10 ते 16 मार्च दरम्यान होत असून या अनुषंगाने आयोजकांकडून तयारीला वेग देण्यात आला आहे. भाविकांची होणारी गर्दी पाहता भुसावळ-रावेर व भुसावळ-यावल मार्गावरील अवजड वाहतूक 10 ते 16 दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे मात्र बसेस व खाजगी वाहनधारकांसाठी हा रस्ता खुला असणार आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यावर भर
शिवमहापुराण कथेच्या कालावधीत भाविकांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने वाहतुकीत बदल केले. त्यासाठीचा आराखडा भुसावळ शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक उमेश महाले यांनी तयार केला. या आराखड्याच्या अनुषंगाने वाहतूक शाखेच्या पथकाने मंगळवारी शहराजवळील तापी नदीचा पूल आणि बंद केलेल्या टोलनाका परिसरात पाहणी केली. त्यात कथेच्या कालावधीत कोंडी टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? याचा आढावा घेतला.


आरटीओ विभागाला देणार पत्र
भुसावळ ते फैजपूर मार्गाचे रुंदीकरण व मध्य प्रदेशात जाणारी आणि तिकडून भुसावळकडे येणारी जड वाहने रावेरहून मुक्ताईनगरमार्गे पुढे जातील. ही वाहने सध्या रावेर, सावदा, फैजपूरकडून भुसावळकडे येतात. कथा कालावधीत ती मुक्ताईनगरमार्गे धावतील. गुजरातकडून विदर्भाकडे येणारी वाहने शिरपूर-चोपडा-यावल-भुसावळ मार्गे न येता शिरपूरहून थेट धुळे-जळगावमार्गे भुसावळ बाहेरील राष्ट्रीय महामार्गाने ये-जा करतील.

खासगी वाहनांना मुभा
10 ते 16 मार्चदरम्यान अकलूद शिवारातील मुख्य मार्गावर ट्रॉला, कंटेनर आणि डंपर यासारख्या मोठ्या वाहनांना पूर्णपणे बंदी असलीतरी रावेर आणि यावलकडे जाणार्‍या एस.टी.बसेस या मार्गावरून सुरू राहतील. स्थानिक नागरिकांना त्यांच्या खाजगी वाहन धारकांना मात्र या रस्त्यावर प्रवास करता येणार आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !