भुसावळात ईनरव्हीलतर्फे गरजूंसाठी टॅली प्रशिक्षण शिबिर
भुसावळ (25 फेब्रुवारी 2026) : शहरातील इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व एच.आर.वायकोळे इन्स्टिट्यूट ऑफ वोकेशनल एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील 25 गरजू मुलींसाठी 7 ते 14 ऑगस्ट 2025 दरम्यान आठ दिवसीय मोफत टॅली प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दररोज सायंकाळी 4 ते 6 या वेळेत झालेल्या प्रशिक्षणात मुलींना टॅलीचे मूलभूत ज्ञान, खातेनिहाय व्यवहार नोंदणी, जीएसटी व करप्रणालीची प्राथमिक माहिती तसेच आर्थिक अहवाल तयार करण्याचे मार्गदर्शन देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही पुढील एक वर्ष मुलींना ऑनलाइन साईट किंवा अॅपच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवता येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर सर्व सहभागी मुलींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. मुलींच्या कौशल्य विकासासाठी आणि स्वावलंबनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रमाणपत्र वितरण समारंभास सचिव योगीता वायकोले, सुनीता पाचपांडे, शर्वरी फालक आदी उपस्थित होत्या. महिलांनी सर्व क्षेत्रांत प्रावीण्य मिळवावे, ही संकल्पना क्लबच्या अध्यक्षा सीमा सोनार यांची असून, त्याच प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला.