शिक्षक मेल आयडी विसरले : गाडर्यातील सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला मुकले !
Teacher forgot email ID: Six students in the train missed the scholarship exam! यावल (25 फेब्रुवारी 2026) : यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या अतिदुर्गम भाग गाडर्या येथील सहा विद्यार्थी रविवारी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहिले. दरम्यान, शाळेवरील शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून दिले नाही, असा आरोप पालकांनी केला. तर ज्या शिक्षकाने विद्यार्थ्यांचा अर्ज करतांना मेल आयडी टाकला तो विसरल्याने हॉल टिकीट मिळवता आले नाही, असे सांगितले.
काय आहे नेमके प्रकरण ?
रविवारी यावल शहरात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा होती. या परीक्षेसाठी सातपुड्याच्या कुशीत असलेल्या गाड्र्या येथील जिल्हा परिषद शाळेतील सहा विद्यार्थी यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता मात्र या सहा विद्यार्थ्यांना त्यांचा पेपर कुठे होईल याची माहिती देण्यात आली नाही तसेच त्यांना हॉल तिकीट देखील उपलब्ध करून देण्यात आले नाही. परिणामी सकाळी 11 वाजता पेपरच्या वेळेवर हे विद्यार्थी जिल्हा परिषद गाड्र्या येथील शाळेजवळ हजर होते.

शिक्षकांना कॉल केल्यानंतर शिक्षक हे यावलला होते.न हॉल तिकीट आपल्याला मिळू शकले नाही म्हणून आता तुम्हाला पेपर पण देता येणार नाही, असे शिक्षकाने सांगितले. एकूणच शिक्षकांच्या भोंगळ कारभारामुळे सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहिल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. या संदर्भात पालक सुरेश बारेला यांनी यापूर्वी देखील पंचायत समितीकडे सदर शाळेत नियमित शिक्षक द्यावे व येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे यासंदर्भात अर्ज देखील दिला होता.
मेल आयडीमुळे अडचण
आपण चार महिन्यापूर्वी शाळेत हजर झालो. यापूर्वीचे असलेले शिक्षक अरूण बारेला यांनी संबंधित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज केले होते. मात्र, कोणत्या ईमेल आयडी वरून केले. हे तेच विसरले आणि मेलवर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट येणार होते. तो मेलच आम्हाला प्राप्त झाला नाही म्हणून अडचण झाल्याचे तेथील शिक्षक धनसिंग परदेशी यांनी सांगितले.