जळगावात दुचाकीच्या डिक्कीतून आठ लाख रुपये लांबवले
Eight lakh rupees stolen from the trunk of a two-wheeler in Jalgaon जळगाव (26 फेब्रुवारी 2026) : शहरातील मध्यवस्तीतील जुन्या बस स्थानक परिसरातून एका दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्याने आठ लाखांची रोकड लांबवली. ही घटना बुधवार, 25 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री 11 वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले जळगावात ?
शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील प्रेम महारु जाधव (35) हे एका खाजगी ठिकाणी सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. बुधवार, 25 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्रेम जाधव हे आपल्या दुचाकी क्रमांक (एम.एच. 19 बी.के.8176) ने जुन्या बस स्थानक परिसरातील संघवी पाईपच्या बाजूला असलेल्या एका पंचरच्या दुकानावर गेले असता ते पंचर काढण्याच्या कामात व्यस्त असताना अज्ञाताने दुचाकीची डिक्की उघडून त्यातील 10 लाखांपैकी आठ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यावर जाधव यांना मोठा धक्का बसला.

या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसात धाव घेतल्यानंतर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीचे काम सुरू आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहे.