अवैध सावकाराचा जाच असह्य : चोपड्यात तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
The persecution of illegal moneylenders is unbearable : A young man in Chopra took extreme measures चोपडा (27 फेब्रुवारी 2026) : शहरातील योगेश सुनील चौधरी या तरुणाने खाजगी अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. 0 हजार रुपयांच्या कर्जापोटी तब्बल दोन लाख रुपये व्याज भरूनही सावकाराचा छळ थांबत नसल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. 25 तारखेला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास योगेशने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
10 हजारांच्या बदल्यात दोन लाखांची वसुली
मयत योगेश हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. अत्यंत गरिबीत असलेल्या योगेशने पिंटू नामक व्यक्तीकडून 10 हजार रुपये उसने घेतले. या तुटपुंज्या रकमेच्या बदल्यात सावकाराने आतापर्यंत योगेशकडून दोन लाख रुपये व्याजापोटी वसूल केले होते. तरीही सावकाराची पैशांची भूक शमली नव्हती. तो वारंवार योगेशकडे अधिक पैशांसाठी तगादा लावत होता.

मृत्यूपूर्वी चिठ्ठीत मांडली व्यथा
घटनेनंतर योगेशच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली आहे. या चिठ्ठीत त्याने सावकार पिंटूच्या क्रूरतेचा पाढाच वाचला आहे. केवळ पैशांचा तगादाच नाही, तर पिंटूने योगेशला मारहाण केली होती आणि त्याच्या वृद्ध आई-वडिलांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे योगेशने चिठ्ठीत नमूद केले आहे. पिंटूला कडक शिक्षा व्हावी, अशी आर्त सादही त्याने आपल्या शेवटच्या पत्रात घातली आहे.
कुटुंबाचा आधार हरपला
योगेशच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. हे संपूर्ण कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. अत्यंत कष्टाळू मुलाचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, दोषी सावकारावर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून होत आहे.