वराडसीमजवळ साकारतेय ‘प्रभास्वर’ ध्यान साधना केंद्र
रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या अस्थींचे दर्शन
भुसावळ (27 फेब्रुवारी 2026) : वराडसीमजवळ वाघूर धरण रस्त्यावरील साडेपाच एकर विस्तीर्ण परिसरात ’प्रभास्वर ध्यान साधना व कृषी संशोधन केंद्र’ आकाराला येत आहे. या केंद्रात रविवारी, सकाळी 11 वाजता एक विशेष सोहळा रंगणार असून, यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे दर्शन आणि नूतन ’शाक्यमुनी कुटी’चे लोकार्पण करण्यात येणार आहे.
त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे उभारण्यात येत असलेल्या या केंद्राचा मुख्य उद्देश युवा पिढीमध्ये संविधानिक मूल्ये, समता, मानवता आणि बंधुत्वाचा विचार रुजवणे हा आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि प्रवचन नागपूर येथील प्रसिद्ध धम्मचारी अमृतदीप यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी भुसावळचे धम्मचारी सत्यवज्र असतील. धम्मचारी, धम्ममित्र आणि दानशूर व्यक्तींच्या लोकवर्गणीतून या केंद्रासाठी साडेपाच एकर जागा खरेदी करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून येथे टप्प्याटप्प्याने विकासकामे सुरू आहेत. या मंगलमय सोहळ्याला जास्तीत जास्त धम्मबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे करण्यात आले आहे.



असे आहे ध्यान साधना केंद्र
निसर्ग संवर्धन : केंद्रात पाणी व्यवस्थापन करून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली आहे.
ध्यान साधना : सध्या येथे एकदिवसीय धम्म शिबिरे आणि ध्यान सत्रे नियमितपणे घेतली जात आहेत.
भव्य नियोजन : पहिल्या टप्प्यात शाक्यमुनी कुटीचे काम पूर्ण झाले असून, दुसर्या टप्प्यात एकाच वेळी 200 लोक साधना करू शकतील असे भव्य विहार आणि निवासस्थान उभारले जाणार आहे.
पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी पाठपुरावा
या केंद्राला शासकीय ’पर्यटन स्थळा’चा दर्जा मिळावा, यासाठी महासंघाचे प्रयत्न सुरू आहेत. पर्यटन दर्जा मिळाल्यास या परिसराचा सर्वांगीण विकास होऊन सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे. आगामी पावसाळ्यात येथे तब्बल एक हजार वृक्ष लावण्याचा संकल्पही करण्यात आला आहे.