भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
Marathi Language Pride Day celebrated with enthusiasm at De.N.A. Bhole College in Bhusawal भुसावळ (27 फेब्रुवारी 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात वाङ्मय मंडळाच्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी साहित्याचे ज्येष्ठ कवी व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. व्यासपीठावर वाङ्मय मंडळाच्या अध्यक्षा डॉ.अंजली पाटील, डॉ.जे. बी.चव्हाण, कुंदा पेंढारकर, सुशीला बाटे तसेच अश्विनी भाग्यवंत उपस्थित होते.



कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषेच्या गौरवगीताने व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात डॉ. अंजली पाटील यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगावा आणि तिच्या समृद्ध परंपरेचा अभ्यास करावा, असे आवाहन केले.
यावेळी कुंदा पेंढारकर यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व विषद केले. त्यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी मराठी भाषेचे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले. जागतिकीकरणाच्या युगात मातृभाषेचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.