अजित पवारांच्या विमान अपघातामागे काहीतरी काळेबेरे ! राज ठाकरेंचा संशय
Something sinister behind Ajit Pawar’s plane crash! Raj Thackeray suspects मुंबई (27 फेब्रुवारी 2026) : अजितदादा पवारांच्या विमान अपघात प्रकरणी सरकार गुन्हा दाखल करण्यास घाबरत असल्याने यामागे काही काळेबेरे असा संशय निर्माण होतोय, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. सरकार एका एफआयआरला का घाबरत आहे? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती राज ठाकरे यांनी या प्रकरणी केली.
रोहित पवारांनी घेतली भेट
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी सरकारवर उपरोक्त प्रश्नांच्या फैरी झाडल्या. ते म्हणाले, रोहित पवार यांनी आज माझी भेट घेतली. त्यांनी मला अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी सर्व तांत्रिक गोष्टी सांगितल्या. मला त्यांच्या सगळ्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली. त्यांनी तीन ठिकाणी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला पण तिन्ही ठिकाणी सरकारच्या दबावामुळे एफआयआर नोंदवणून घेण्यात आला नाही. त्यामुळे मला इथेच संशयाची सुई वाटते.



सरकारकडून अडथळे का आणले जात आहेत?
पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेऊ नये असे सरकारला का वाटत आहे? मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन येथील अधिकारी एफआयआर लिहून घेत होते. पण तो टाईप करत असतानाच डीसीपी आले. त्यांनी एफआयआर लिहू नका असे सांगितले. हे कशासाठी? हा निव्वळ अपघात असेल, तो घातपात नसेल किंवा त्यांच्या कुटुंबीयांना याविषयी काही संशय असेल आणि तपास नीट व्हावा अशी त्यांची इच्छा असेल तर या प्रकरणी एफआयआर दाखल झाला पाहिजे. पण त्यात सरकारकडून अडथळे का आणले जात आहेत? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
रोहित पवारांच्या मागणीत गैर काय?
राज ठाकरे यांनी यावेळी रोहित पवार यांच्या मागणीत काहीही गैर नसल्याचेही ठणकावून सांगितले. रोहित पवार यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल व्हावा, चौकशी व्हावी अशी मागणी केली असेल तर त्यात गैर काय? सरकारने या गोष्टींकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. तसेच या प्रकरणी स्पष्टीकरणही दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
सरकारचा संशयाचे भूत नाचवण्याचा प्रयत्न
राज ठाकरे यांनी यावेळी विमानाच्या ब्लॅक बॉक्स खराब झाल्याचा दावाही धुडकावून लावला. ते म्हणाले, ब्लॅक बॉक्स अद्याप काही कळले नाही. पण अपघातात विमानाचे कितीही नुकसान झाले तरी ब्लॅक बॉक्सचे नुकसान होत नसते. सरकार संशयाचे भूत नाचवत आहे. माझा साधा प्रश्न आहे, एफआयआर का नोंदवला जात नाही? हे महाराष्ट्राला कळले पाहिजे. हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. आपल्यातून एक व्यक्ती गेली आहे. इतका दुर्दैवी अपघात कुणाचाच होऊ नये. या प्रकरणी काही त्रृटी असतील व एफआयआरमध्ये त्या गोष्टी मांडायच्या असतील तर मांडू दिल्या पाहिजेत. यातून आपण महाराष्ट्र भलत्या दिशेकडे घेऊन जात आहोत हे दिसून येते. या प्रकरणी सरकारचा दबाव असेल तर अधिकार्यांना दोष का द्यायचा? आमदार व खासदारांनी हा विषय अधिवेशनात मांडला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.