जळगाव स्थायी समिती सभापतीपदी डॉ.चंद्रशेखर पाटील
महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध
Dr. Chandrashekhar Patil appointed as Chairman of Jalgaon Standing Committee जळगाव (28 फेब्रुवारी 2026) : जळगाव महापालिकेच्या विशेष महासभेत शुक्रवार, 27 रोजी स्थायी समिती व महिला-बालकल्याण समिती सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रियेत भाजपचे डॉ.चंद्रशेखर पाटील यांची स्थायी समितीपदी, तर शिवसेनेच्या सिंधू कोल्हे यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर झाली.
यांची होती उपस्थिती
महापालिकेच्या दुसर्या मजल्यावरील सभागृहात विशेष महासभेचे आयोजन सकाळी अकरा वाजता करण्यात आले होते. व्यासपीठावर पीठासीन अधिकारी तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, तसेच नगरसचिव सतीश शुक्ला उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला पीठासीन अधिकार्यांनी स्थायी समिती सभापतिपदासाठी आलेल्या अर्जाची माहिती दिली.


डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे चार अर्ज आले होते. यात पहिल्या अर्जावर सूचक म्हणून नितीन लढा व अनुमोदक विशाल भोळे होते. अर्ज छाननीनंतर पंधरा मिनिटांचा माघारीचा अवधी देण्यात आला. मात्र, या कालावधीत अन्य कोणताही अर्ज मागे घेण्यात आला नाही. परिणामी, डॉ. पाटील यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
यानंतर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी अर्ज छाननी करण्यात आली. सिंधू कोल्हे यांचे दोन अर्ज आले होते. पहिल्या अर्जात सूचक प्रतिभा देशमुख व अनुमोदक अमृता सोनवणे यांनी दाखल केला होता. अर्ज छाननीनंतर पंधरा मिनिटांचा माघारीचा अवधी दिला गेला. वेळ संपल्यानंतर अन्य कोणताही अर्ज मागे घेण्यात आला नसल्याने सिंधू कोल्हे यांची महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवडीनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीतर्फे जल्लोष केला. महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी यांनी पुष्पगुच्छ देऊन दोन्ही सभापतींचे जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सिंधूताई कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आगामी काळात शहरातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कल्याणासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली. यानंतर दोन्ही सभापतींनी आपल्या कक्षामध्ये जाऊन पदभार स्वीकारला.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात जळगावकरांसाठी सर्व सुविधा देण्यासाठी तरतुद करण्यात येणार असून या माध्यमातून कोणताही नागरीक नागरी सुविधांपासून वंचित राहणार नाही, अशी प्रतिक्रीया नवनियुक्त स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी दिली आहे.