आमदार निधीतील अडीच कोटींच्या कामांना नाहरकत द्यावी : भुसावळात बालकल्याण सभापती शोभा इंगळे यांची मागणी
The works worth 2.5 crores in the MLA fund should be allowed: Demand of Child Welfare Chairperson Shobha Ingle in Bhusawal भुसावळ (28 फेब्रुवारी 2026) : भुसावळ शहराच्या विकासासाठी मंत्री व आमदार संजय सावकारे यांनी अडीच कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी निधी मंजूर केला असून ही कामे पालिका हद्दीतील असल्याने नाहरकत प्रमाणपत्र द्यावी, अशी मागणी भुसावळ पालिकेच्या बालकल्याण समिती सभापती शोभा रणधीर इंगळे यांनी शुक्रवार, 27 रोजी पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्याकडे केली.
थोर पुरूषांच्या स्मारकाची व्हावी डागडूजी
सभापती शोभा इंगळे यांनी यावेळी पालिका मुख्याधिकार्यांना निवेदन देत शहरातील थोर पुरूषांच्या पुतळ्याची डागडूजी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. आगामी 6 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती असून 14 एप्रिल रोजी घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. दोन्ही थोर पुरूषांच्या स्मारकाची स्थिती सुधारुन नूतनीकरण करण्यासाठी प्रत्येकी दहा लाखांचा निधी पालिका फंडातून मंजूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


भाजपा नगरसेवकांनीही घेतली भेट
भुसावळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवकांनी विरोध केलेले 177 विषय नामंजूर करावे, त्याची नोंद प्रोसिडिंगमध्ये करावी, अमृत योजनेतून रखडलेल्या जलकुंभाच्या कामाला गती द्यावी, आमदार निधीतून मंजूरी मिळालेल्या अडीच कोटींच्या विकास कामांना पालिकेने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे आदी मागण्यांसाठी शुक्रवारी भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांची भेट घेतली. काही दिवसांपासून रजेवर असलेले मुख्याधिकारी राजेंद्र फातले पुन्हा पालिकेत हजर झाले आहे. त्यानंतर भाजपचे गटनेते युवराज लोणारी व नगरसेवकांनी त्यांची भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली.
नाहरकत प्रमाणपत्र द्यावे
मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या प्रभारी काळात पालिकेची सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेत 250 विषय अजेंड्यावर होते. मात्र, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 33 नगरसेवकांनी 177 विषयांना विरोध दर्शवला होता. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी या विषयांना आवाजी मंजुरी दिली होती. बहुमतामुळे हे विषय नामंजूर करावे, तशी नोंद प्रोसिडिंगमध्ये घ्यावी. सत्ताधारी हे विषय मंजूर करत असतील तर मुख्याधिकार्यांनी कलम 308 प्रमाणे हे विषय नामंजूर करण्याचा जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव द्यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. भुसावळ शहरासाठी आमदार निधीतून अडीच कोटींची कामे होणार आहे. नगरपालिका प्रशासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने हे काम रखडले असल्याने विकास कामांमध्ये अडथळा न आणता या ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली. या वेळी उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, निर्मल कोठारी, गिरीश महाजन, किरण कोलते, परीक्षित बर्हाटे, आशिष पटेल, सुजीत भोळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.