यावल तालुका खुनाने हादरला : जुन्या वादातून हिंगोण्यात तरुणाची हत्या ; चाकूहल्ल्यात तिघे गंभीर
अल्पवयीनासह सात जणांविरोधात गुन्हा : सर्व संशयीतांना अटक : आरोपीत मुंबई पोलिस दलातील कर्मचार्याचा समावेश
यावल (28 फेब्रुवारी 2026) : भुसावळात मित्रांच्या भांडणातून एकाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच यावल तालुक्यातूनही खुनाची घटना समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यातील हिंगोणा येथे किरकोळ वादातून एका 19 वर्षीय तरुणाची लाठ्या-काठ्या चाकूने भोसकून हत्या करण्यात आली तर आरोपींच्या हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रथमेश मुकेश महाले (19, हिंगोणा, ता.यावल) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
चाकू हल्ल्यात तिघे गंभीर
सात आरोपींनी केलेल्या हल्ल्यात रीना मोहित गजरे (19), मोहित राजेंद्र गजरे (30), निखील राजेंद्र गजरे (26) हे तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


पोलिस कर्मचार्यासह सात संशयीतांविरोधात गुन्हा
तरुणाच्या खून प्रकरणी रीना रोहित गजरे (19) यांच्या तक्रारीवरून संशयित अल्पवयीनासह सुधीर रमेश तायडे, मनोज सुधीर तायडे, सचिन सुधीर तायडे, आरती सचिन तायडे, मंगलाबाई सुधीर तायडे (रा. हिंगोणा, ता.यावल), निखील संजय तायडे (रा.मारुळ, ता.यावल) यांच्याविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींमध्ये मनोज सुधीर तायडे या मुंबई पोलिस दलातील कर्मचार्याचा समावेश आहे.
अधिकार्यांची धाव : सहा आरोपींना अटक
खुनाच्या घटनेनंतर डीवायएसपी अनिल बडगुजर, निंभोरा सहाय्यक निरीक्षक मीरा देशमुख व कर्मचार्यांनी धाव घेतली. खून प्रकरणी एका अल्पवयीन विधी संघर्षीत बालका सह सर्व सहा संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे. हिंगोणा गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.