भुसावळातील वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचे सवलतीत तीर्थाटन
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे - एस.टी.संगे तीर्थाटन योजनेचा लाभ
भुसावळ (1 मार्च 2026) : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन योजनेअंतर्गत शहरातील वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य तिर्थक्षेत्र शेगाव येथे श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी रवाना झाले. या योजनेची अंमलबजावणी अजूनही मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी असे धार्मिक उपक्रम नक्कीच लाभदायक ठरतील, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले.
44 सदस्य शेगाव रवाना
शहरातील ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव जेष्ठ नागरिक संघाचे जवळपास 44 सभासद रविवारी सकाळी श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगावला रवाना झाले. यावेळी भुसावळ आगाराचे वाहन चालक एन.एस.कोळी, वासुदेव जेष्ठ नागरीक संघाचे संयोजक डॉ.नि.तु.पाटील आदी सर्व सभासद उपस्थित होते. प्रभाकर झांबरे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवत एसटी शेगावच्या दिशेने गण गण गणात बोतेचा गजर करत बस रवाना करण्यात आली.


मूळ तिकीटावर 50 टक्के सवलत
मंत्री सावकारे म्हणाले की, राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संघे तीर्थाटन सेवा सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 40 प्रवासांचा गट तयार झाल्यास महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मूळ तिकिटावर 50 टक्के सवलत तर 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास देण्यासाठी आगार विभागनिहाय बसेस आरक्षित केल्या आहेत.
‘स्वस्त आणि सुरक्षित’ या ब्रीद वाक्यावर ही योजना आधारित असून सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल अशा दरात धार्मिक पर्यटनाची अनुभूती देण्याचा तिचा मुख्य उद्देश आहे. अभ्यासू आणि चिकित्सक वृत्ती असल्याने डॉ.नितु पाटील जेष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवित असतात. सूत्रसंचालन सतीश जंगले तर प्रस्तावना डॉ.नि.तु.पाटील तसेच आभार प्रकाश पाटील यांनी मानले.
धार्मिक सहल आणि उत्साहीत जेष्ठ नागरिक
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन योजनेचा लाभ घेणारा वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघ हा भुसावळ तालुक्यातील पहिला ज्येष्ठ नागरिक संघ ठरला आहे. श्री गजाजन महाराज दर्शनासाठी सर्व जेष्ठ नागरीक आनंदी आणि उत्साही दिसत आहेत, असे संयोजक डॉ. नितू पाटील म्हणाले.






