नागपूर हादरले : दारुगोळा निर्मिती करणार्या कंपनीत स्फोट ; 17 कामगार ठार
Nagpur shaken: Explosion in ammunition manufacturing company; 17 workers killed नागपूर (1 मार्च 2026) : नागपूरातील दारुगोळा निर्मिती करणार्या कंपनीत रविवारी सकाळी भयंकर स्फोट झाल्याने यात 17 कामगार ठार झाले तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
सकाळी सात वाजता घडला स्फोट
नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील राऊळगावलगतच्या येनवरा गावात एसबीएल एनर्जीचा प्रकल्प आहे. या ठिकाणी डेटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोजिव्ह, कास्ट बूस्टर्स, सिजमिक एक्सप्लोसिव्ह्सचे उत्पादन होते. त्यातीलच एका युनिटमध्ये रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाला. त्यात 17 जण ठार झालेत. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याची पुष्टी केली आहे. जखमींची नेमकी माहिती हाती यायची आहे. ही घटना घडली तेव्हा एसबीएलच्या विविध युनिटमध्ये 30 हून अधिक कर्मचारी काम करत होते. त्यामुळे मृत्त व जखमींचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे.


जखमींना उपचारासाठी नागपूरला हलवले
अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्फोटानंतर लागलेली आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिस, स्थानिक प्रशासन व कंपनीचे बचाव पथक घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर करत आहे. या ढिगार्याखाली काही कामगार अडकल्याची भीती आहे त्यामुळे या घटनेत नेमकी किती प्राणहानी झाली याचा निश्चित आकडा समोर आला नाही. जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे.
डिटोनेटर तयार करताना झाला स्फोट?
कळमेश्वर (नागपूर) येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) ही एक प्रमुख औद्योगिक स्फोटके बनवणारी कंपनी आहे. ही कंपनी खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी स्फोटके, डिटोनेटर्स आणि संबंधित उत्पादने तयार करते. ही कंपनी एकाच व्यवस्थापनाखाली कार्यरत आहे. सकाळी कामगार कामावर रुजू झाले असताना डिटोनेटर बनवण्याच्या प्रक्रियेत अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज परिसरात दूरवर ऐकू आला.
घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घटनेवर शोक व्यक्त करताना म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.






