भुसावळात वेळ विचारल्याचे कारण ठरले प्रौढाचे मृत्यूचे कारण ! खुनानंतर आरोपी चालतच पोलिस ठाण्यात आला


भुसावळ (1 मार्च 2026) : गुन्हेगारीसाठी बदनाम असलेल्या भुसावळात पुन्हा एकदा खुनाची घटना समोर आल्याने समाजमन चिंतीत झाले आहे. क्षुल्लक कारणावरून भुसावळात पुन्हा खुनाची घटना घडली असून या घटनेत तरुणाने समोरील प्रौढाला किती टाईम झाला? असे विचारले मात्र समोरील व्यक्ती आपल्यास चिडवत असल्याचा संशय निर्माण झाल्याने संतापाच्या भरात सिमेंटची कुंडी डोक्यात मारुन खून करण्यात आला. आरोपी खुनानंतर स्वतःच पोलिस ठाण्यात चालत आला व त्याने खुनाची कबुली दिली.

किरकोळ वादातून घटना
शहरातील यशोधन पार्क भागात सलून दुकानाच्या ओट्यावर बसलेल्या अनिल आत्माराम सावकारे (42, रा.आनंद नगर, गोविंद कॉलनी) यांनी समोरुन जाणारा रोहित पुरुषोत्तम भावसार (रा.नेब कॉलनी) याला किती टाईम झाला? असे विचारले मात्र अनिल आपल्यास चिडवत असल्याच्या संशयाने रोहितने त्याला मारहाण केली. डोक्यात फुलझाडांची रिकामी कुंडी मारुन अनिलचा खून केला. ही घटना शुक्रवार, 27 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. किरकोळ वादातून झालेल्या खुनाच्या घटनेमुळे भुसावळ शहर हादरले आहे. बाजारपेठ पोलिसांनी रोहितला अटक केली.



फुलझाडांची सिमेंटची रिकामी कुंडी मारली डोक्यात
अनिल सावकारे हे शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास ओम सलूनजवळ उभे होते. यावेळी तिथे असलेल्या रोहित भावसारला त्यांनी वेळ विचारली. मात्र, हा मला माझ्या आईवरून चिडवत आहे,’ असा संशय रोहितच्या मनात घर करून बसला. यामुळे त्याने आधी अनिलला शिवीगाळ व मारहाण सुरू केली. साक्षीदार आशिष संतोष सुरवाडे हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता रोहितने त्यांनाही मारहाण केली. यादरम्यान शेजारीच असलेली फुलझाडांची सिमेंटची रिकामी कुंडी उचलून डोक्यावर दोन ते तीनवेळा मारल्याने अनिल जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी मृताचे भाऊ भागवत सावकारे यांनी फिर्याद दिली.

अनिल सावकारे यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शनिवारी तापी नगर स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे आनंद नगर भाग हादरला आहे. दरम्यान, घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेली रक्ताने माखलेली कुंडी जप्त करण्यात आली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !