अकलूद शिवारातील शिवपुराण कथेसाठी आठ लाखांवर भाविक येणार
आयोजकांची माहिती : अडीच हजार स्वयंसेवक देणार सेवा : पार्किंगची चोख व्यवस्था
भुसावळ (2 फेब्रुवारी 2026) : भुसावळजवळील अकलूद शिवारात 10 ते 16 मार्चदरम्यान पं.प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा होत आहे. या कथेसाठी राज्यभरातून सुमारे 8 ते 10 लाख भाविक येण्याची शक्यता असून या अनुषंगाने आयोजकांकडून तयारी केली जात असल्याची माहिती शिवमहशुराण कथा समिती पाडळसेतर्फे देण्यात आली. या कथेसाठी अडीच हजार स्वयंसेवक सेवा देणार असून कथास्थळी सर्व बाजूंनी येणार्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली.
पंखे व कुलरचीही व्यवस्था
आगामी काळ उन्हाळ्याचा असल्याने भाविकांना त्याची झळ बसू नये यासाठी कथा स्थळी पंखे, कुलर बसवले जाणार असल्याची माहिती शिवमहापुराण कथा समितीने रविवारी कथास्थळी पत्रकार परिषदेत दिली.


पाकिंगसाठी अशी आहे व्यवस्था
कथेसाठी भुसावळकडून येणार्या दुचाकींसाठी संत आसाराम बापू आश्रम परिसर, चारचाकी वाहनांसाठी यावल रोडवरील सिमेंट फॅक्टरी शेजारी व समोर एसटी पार्किंग यावल, फैजपूर रोडवरील वाय पॉइंटवर राहणार आहे. यावल, चोपडा व शिरपूरकडून येणार्या बाहनांसाठी अंजाळे, पिळोदे रस्त्यावर समृद्धी पार्कमध्ये पार्किंग असेल तर सावदा व फैजपूरकडून येणार्या वाहनांसाठी नायरा पेट्रोल पंप, पाडळसेजवळील दोन्ही बाजू व सावदा फैजपूरकडून येणार्या बसेससाठी भोरटेक फाट्याजवळ पार्किग असेल. वरणगाव व मुक्ताईनगरकडून येणार्या वाहनांसाठी हतनूर धरण, दुसखेडामार्गे कठोरा फाट्याजवळ तर जळगावकडून येणारी वाहने शेळगाव बॅरेज येथील खालच्या व वरच्या पूलाकडून येतील.
अशी आहे व्यवस्था
कथेसाठी तीन भब्य डोम असतील, शिवाय 40 बाय 80 फुटांचे मुख्य व्यासपीठ असेल. 15 बाय 15 आकारातील दोन हजार मंडप टाकले जातील. आवश्यकतेनुसार ते वाढवले जातील, रात्रीच्या वेळी प्रखर उजेड देणारे दिवे, वीजपुरवठा, जनरेटरची व्यवस्था असेल.







