भुसावळकरांची करवाढीतून सुटका : 372 कोटींचा अर्थसंकल्प सादर
शिलकी अंदाजपत्रकासह विकासकामांना गती देण्याचा निर्धार
Bhusawalkars released from debt: Budget of Rs 372 crore presented भुसावळ (4 मार्च 2026) : नाशिक विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका असलेल्या भुसावळ नगरपालिकेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा सुमारे 372 कोटी 35 लाख 94 हजार 614 रुपयांचा अर्थसंकल्प सोमवार, 2 मार्च रोजी दुपारी चार वाजता झालेल्या विशेष अर्थसंकल्पीय सभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात 35 लाख 58 हजार 461 रुपयांचा शिलकी अंदाज दर्शविण्यात आला. कोणत्याही प्रकारची करवाढ न झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यांची होती उपस्थिती
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष गायत्री भंगाळे होत्या. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष शैलजा नारखेडे, मुख्याधिकारी राजेंद्र फातले व लेखापाल अय्युब तडवी उपस्थित होते. सभेला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी गटाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.



अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा
अर्थसंकल्पाचे वाचन सुरू असताना विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. भाजप गटनेते युवराज लोणारी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) गटनेते सचिन चौधरी, माजी आमदार तथा नगरसेवक संतोष चौधरी, तसेच नगरसेवक किशोर कोलते, पिंटू कोठारी, गिरीश महाजन, राजेंद्र आवटे आणि शोभा इंगळे यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.
अंदाजपत्रकाच्या बुकलेटमध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्याचे नगरसेवक पिंटू कोठारी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मुख्याधिकारी यांनी त्या चुका मान्य करत दुरुस्तीचे आश्वासन दिले. तसेच नगरपालिकेच्या निधीतून उभारण्यात आलेली सोलर यंत्रणा अद्याप कार्यान्वित का झालेली नाही, असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या प्रकल्पामुळे दरमहा लाखो रुपयांची बचत होऊ शकते, मात्र त्याचा लाभ मिळत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पथदिवे आणि सायबर उलट्या चर्चेचा विषय
शहरातील पथदिवे दिवसभर सुरू राहण्याच्या प्रश्नावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली. यावेळी मुख्याधिकारी यांनी पथदिव्यांच्या ‘सायबर उलट्या’ झाल्याचा संशय व्यक्त करत, रात्री दिवे बंद आणि दिवसा सुरू अशी गंमतीशीर टिप्पणी केली. या मुद्यावर सभागृहात काही काळ हंशा पिकला, मात्र समस्या तातडीने सोडवण्याची मागणी सर्वांनीच केली.
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न
नगरसेविका प्राची पाटील व शोभा इंगळे यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येकडे लक्ष वेधले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
तापी नदी प्रदूषणावर गंभीर चर्चा
तापी नदी पात्रात सोडण्यात येणार्या सांडपाण्यामुळे वाढणार्या प्रदूषणाचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. गटनेते युवराज लोणारी यांनी याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले व सर्वच नगरसेवकांनी चिंता व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. गटनेते सचिन चौधरी यांनी नदीपात्रात कासवांचे मृत्यू होणे धक्कादायक असल्याचे नमूद करत पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले.
एकूणच, कोणतीही करवाढ न करता शिलकी अर्थसंकल्प सादर करताना विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी काळात प्रशासनाने चर्चेत मांडलेल्या प्रश्नांवर ठोस कार्यवाही केल्यास नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







