भुसावळात लेडीज रनच्या सराव शिबिरास उत्साहात सुरुवात
पहिल्याच दिवशी 56 महिलांची उपस्थिती
भुसावळ (4 मार्च 2026) : भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे 12 एप्रिल रोजी बिसारा लेडीज इक्वॅलिटी रनचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांना धावण्याचा योग्य सराव व्हावा या उद्धेशाने प्रत्येक मंगळवार, गुरुवार व रविवारी सकाळी 6 ते 7 या वेळेत शहरातील कृष्णचंद्र सभागृहाशेजारील मोकळ्या जागेत सराव सत्र घेण्यात येणार आहेत. सर्व सराव सत्र नि:शुल्क आहेत. त्याची सुरुवात मंगळवार, 3 मार्च रोजी ठीक 6 वाजता करण्यात आली. यावेळी स्वतः चांगल्या धावपटू व सायकलपटू असलेल्या जळगावच्या महापौर दीपमाला काळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
सुरुवातीस वार्म अप व्यायाम प्रकार घेण्यात आला. त्यांनतर महापौर दीपमाला काळे व स्पर्धेतील लहान धावपटू अवनी मंगेश चंदन या दोघांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमास विधिवत सुरुवात करण्यात आली. त्यानंतर असोसिएशनच्या नियमित महिला धावपटूंसोबत नवोदित स्पर्धकांनी धावायला सुरुवात केली. यावेळी अग्रस्थानी स्वतः दीपमाला काळे यांच्यासोबत डॉ.नीलिमा नेहेते व डॉ.चारुलता पाटील होत्या. या रनचे शिस्तबद्ध नियमन प्रशांत वंजारी यांनी केले. सर्व धावपटू मैदानापासून डी.आर.एम.कार्यालय-लाल चर्च व तेथून लोको शेड रोड व तेथून पुन्हा मैदानावर परत असे तीन किमी अंतर धावले. त्यानंतर स्ट्रेचिंग व्यायाम प्रकार घेण्यात आला.



याप्रसंगी डॉ नीलिमा नेहेते व डॉ चारुलता पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांचे स्वागत करून सत्कार केला. तसेच यावेळी उपस्थिती लाभलेले उत्तम धावपटू असलेले संजय मोती यांचे स्वागत प्रा.प्रवीण फालक यांनी केले. आपल्या मनोगतात दीपमाला काळे यांनी सलग सहाव्यांदा खास महिलांसाठी अशी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचे कौतुक केले व सर्व महिलांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर आपला फिटनेसचा प्रवास सांगतांना बाहेर गावच्या मॅरेथॉन वेळी भुसावळच्या धावपटूसोबतच्या आठवणी देखील सांगितल्या. व भविष्यात देखील वेळोवेळी या स्पर्धेसाठी उपलब्ध राहील अशी ग्वाही देखील दिली.
अध्यक्षस्थानी प्रा.प्रवीण फालक होते. आभार प्रवीण पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी छोटू गवळी, प्रशांत वंजारी, प्रशांत चौधरी, मंगेश चंदन, प्रविण वारके, सुयश न्याती, संजय तिवारी, राजेंद्र घाटे यांचे सहकार्य लाभले.







