शिवमहापुराण कथा : भुसावळातील महात्मा गांधी पुतळा ते कथा स्थळ मार्गावरील अतिक्रमण हटणार
Shiv Mahapuran Katha : Encroachments on the road from Mahatma Gandhi statue to Katha Sthal in Bhusawal will be removed भुसावळ (5 मार्च 2026) : भुसावळजवळील अकलूद शिवारात 10 ते 16 मार्चदरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेला राज्यभरातून आठ ते दहा लाख भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता भुसावळातील रस्ते गर्दीने फुलणार आहे. या पार्श्वभूमीवर यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते कथा स्थळ मार्गावरील सर्व अतिक्रमित दुकाने, लोटगाड्या, टपर्या हटवण्याचा निर्णय बुधवार, 4 रोजी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
यावल रस्ता घेणार मोकळा श्वास
शिवपुराण कथेच्या अनुषंगाने आज वा उद्यापासून शहरातील गांधी पुतळा ते कथास्थळ या मार्गावरील सर्व टपर्या व हातगाड्या हटवून रस्ता मोकळा करण्यात येणार आहे. बुधवारी कथास्थळी झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी संबंधित विभागांना हे निर्देश दिले. या बैठकीला फैजपूरचे प्रांत बबन काकडे, डीवायएसपी केदार बारबोले, फैजपूरचे डीवायएसपी अनिल बडगुजर, सहा. पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे, तहसीलदार नीता लबडे, वाहतूक शाखेचे अधिकारी उमेश महाले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी भाविकांना पुरवण्यात येणार्या विविध सोयी-सुविधांवरही चर्चा करण्यात आली.













