भुसावळात मारहाण करीत रस्ता लूट : दोन आरोपींना अटक
Road robbery while beating in Bhusawal : Two accused arrested भुसावळ (5 मार्च 2026) : दुचाकीला कट लागण्याच्या बहाण्याने वाद घालून रस्ता लूट करणार्या भुसावळातील भोईवाड्यातील दोघांना शहर पोलिसांनी अटक केली तर अन्य एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. ही घटना शहरातील नवोदय विद्यालय परिसरातील पुलाखाली मंगळवार, 3 रोजी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली.
या संशयीतांना अटक
मयूर प्रकाश भोई (22), योगेश प्रकाश भोई (25, दोन्ही रा.भोईवाडा, भुसावळ) अशी अटकेतील संशयीतांची नावे असून अन्य 17 वर्षीय संशयीताला ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी व त्यांची टोळी आहे का? यादृष्टीने चौकशी सुरू असल्याचे डीवायएसपी केदार बारबोले म्हणाले.






असे आहे लूट प्रकरण
कासोदा, ता.एरंडोल येथील रहिवासी इश्तियाक खान अजीज खान हे त्यांचे काकाचा मुलगा साबीर खान यांच्यासह दुचाकीने ( एम.एच.54 ए. 4368) कासोद्याकडे जात असताना सोबत त्यांचे मेहुणे
अनिस शेख व मोहसीन खान हे दुसर्या दुचाकीवर पुढे चालले होते. नवोदव विद्यालयाजवळील पुलाखालील स्पीड ब्रेकरजवळ तीन अज्ञातांनी त्यांना अडवले.
तुमच्या दुचाकीचा आमच्या गाडीला कट लागला, असे म्हणत मारहाण सुरू केली. इस्तियाक यांच्या खिशातील सहा हजार रुपये हिसकावून घेतले. हा प्रकार पाहून इस्तियाक यांचे मेहुणे मदतीसाठी माघारी फिरले हे पाहून तिन्ही संशयित त्यांची दुचाकी सोडून पळू लागले मात्र इस्तियाक व सहकार्यांनी त्यांना काही अंतरावर पकडले. भुसावळमधील मित्र आणि पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. तपास ग्रेडेड उपनिरीक्षक ईकबाल सैय्यद करीत आहेत.







