भुसावळात किरकोळ वादातून मारहाण करीत दगडफेक
Stone pelting and beating over minor dispute in Bhusawal भुसावळ (5 मार्च 2026) :भुसावळ शहरातील भिरुड हॉस्पिटल परिसरातील संगतसाहेब गुरुद्वारा समोर मोटारसायकल उभी करण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाण व दगडफेकीत झाले. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात 10 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले भुसावळात?
सोनुसिंग दीपसिंग बावरा (42, भिरुड हॉस्पिटल परिसर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते पत्नी निशा कौर, मुलगा सतविर सिंग व मुलगी संजना कौर यांच्यासह वास्तव्यास असून कपड्यांच्या व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 3 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास ते जसपाल सिंग व विक्की सिंग यांच्यासह संगतसाहेब गुरुद्वारा समोर उभे होते. त्यावेळी भुषण मिस्त्री उर्फ बॉबी व प्रसाद किनगे उर्फ खब्या तसेच ‘नमस्कार मंडळ’चे टी-शर्ट परिधान केलेले अंदाजे 10 ते 15 जण तेथे उपस्थित होते.






मोटारसायकल गुरुद्वारा समोरून हटविण्याच्या कारणावरून दोन्ही गटांत वाद झाला. फिर्यादीने मोटारसायकल काढत असताना आरोपींकडून शिविगाळ करण्यात आली व मोटारसायकल जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर भूषण मिस्त्री व प्रसाद किनगे यांनी फिर्यादीस चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावलेल्या जसपाल सिंग व विक्की सिंग यांनाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर संबंधित आरोपींसह अन्य 10 ते 15 जणांनी एकत्र येत दगडफेक केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दगडफेकीत फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर व कानाजवळ दुखापत झाली. गल्लीत उभ्या असलेल्या काही नागरिकांनाही किरकोळ दुखापती झाल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी भूषण मिस्त्री उर्फ बाँबी, प्रसाद किनगे उर्फ खब्या तसेच त्यांच्या सोबत असलेल्या अन्य 10 ते 15 जणांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल तेजस पारसकर करीत आहेत.







