धुळे कारागृहातून खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी पसार
Prisoner serving life sentence for murder escapes from Dhule jail धुळे (6 मार्च 2026) : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी जेल पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाल्याची धक्कादायक घटना धुळ्यात गुरुवारी सकाळी घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पसार कैदी भिकन पिंजारी (54, रा.निफाड, जि.नाशिक) विरोधात धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार कैद्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
भिकन पिंजारी या कैद्याविरोधात पिंपळनेर पोलिसात सी.आर. क्रमांक 89/2017 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 302 व 363 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल असून त्यास 30 एप्रिल 2022 रोजी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पिंजारी यास शिक्षेनंतर धुळे कारागृहात हलवण्यात आल्यानंतर त्यास गुरुवारी सकाळी कारागृह परिसरातील बावडी बाग येथील शेतीकामासाठी नेमण्यात आल्यानंतर संशयीताने जेल पोलिसांची नजर चुकवून पळ काढला.






धुळे जेल प्रशासनाची हलगर्जी ?
विशेष म्हणजे गुरुवारी सकाळी कैदी पसार झाल्यानंतर धुळे कारागृह अधीक्षकांनी धुळे पोलिस अधीक्षकांना घटना घडल्यावर तत्काळ माहिती देणे अत्यंत आवश्यक होते जेणे करून नाकाबंदी आणि इतर उपयोजना करून पसार बंद्याला पकडणे सहज शक्य होते मात्र जेल प्रशासनाने गुरुवारी रात्री आठ वाजता पोलिस प्रशासनाला माहिती दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. जेल प्रशासनाचा हलगर्जीपणादेखील या प्रकारातून समोर आला असून या प्रकरणी आता काय कारवाई होते? याकडे लक्ष लागले आहे.







