स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे जळगाव कनेक्शन : चोपड्यातून आरोपीला अटक
Jalgaon connection of female sperm smuggling case : Accused arrested from Chopda बदलापूर (6 मार्च 2026) :राज्याला हादरवून सोडणार्या बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणात आता जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून सतीश चौधरी याला अटक करण्यात आली आहे. तो चोपडा तालुक्यातील चर्हाडी येथील गौतमनगर परिसरातील रहिवासी आहे.
बनावट आधार कार्ड तयार केल्याचा संशय
सतीश चौधरी हा व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असून त्याच्यावर बोगस आधार कार्ड तयार करून या रॅकेटला मदत केल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी अंबरनाथ येथील चिखलोली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.






या प्रकरणात याआधी सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे, सोनल गरेवाल, सुमित सोनकांबळे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर नाशिकमधून डॉक्टर अमोल पाटील यांनाही पोलिसांनी अटक केली. आता सतीश चौधरीच्या अटकेमुळे तपासाला आणखी गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
असे आहे बदलापूर स्त्री बीज प्रकरण?
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे स्त्रीबीजांच्या अवैध विक्रीचे रॅकेट उघडकीस आले. हे रॅकेट एका घरातून चालवले जात असल्याचा आरोप आहे. सुलक्षणा गाडेकर यांनी घरातच स्त्रीबीज वाढवणारी इंजेक्शन्स बेकायदेशीररीत्या साठवून ठेवली होती, असा पोलिसांचा आरोप आहे. गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना इंजेक्शन दिले जात होते. त्यानंतर गर्भाशयात स्त्रीबीजांची वाढ झाल्यावर संबंधित महिलांना आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवले जात होते. तिथे ऑपरेशन थिएटरमध्ये स्त्रीबीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
या कारवाईत बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकाने धाड टाकून हे रॅकेट उघड केले. संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंध असण्याची शक्यता तपासली जात आहे.







