महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी !
Toilets and sanitary napkin facilities should be provided for women! जळगाव (6 मार्च 2026) : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय असून महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी विशेषतः बाजारपेठेत महिलांसाठी सुसज्ज व सुरक्षित ई-टॉयलेट्स किंवा फिरती स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत, अशी मागणी निधी फाऊंडेशनतर्फे महापौर दीपमाला काळे यांच्याकडे करण्यात आली.
निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली सूर्यकांत विसपुते यांनी नवनियुक्त महापौर दीपमाला काळे यांची भेट घेऊन अभिनंदन केले आणि निवेदन दिले. प्रसंगी हेतल पाटील, यश विसपुते आदी उपस्थित होते.


निधी फाऊंडेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन (MHM) आणि महिलांच्या मूलभूत सुविधांबाबत जनजागृती व विविध उपक्रम राबविले जात आहेत. फाऊंडेशनच्या पाठपुराव्यामुळे शहरातील काही शासकीय कार्यालये व शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन बसविण्यात आले आहेत.
मात्र, शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय असून महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी महिलांसाठी सुसज्ज व सुरक्षित ई-टॉयलेट्स किंवा फिरती स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शहरातील हॉटेल्स आणि पेट्रोल पंपांवरील स्वच्छतागृहे महिलांना वापरण्यासाठी विनासंकोच उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेमार्फत कडक नियमावली लागू करावी.
याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महानगरपालिका शाळांमध्ये मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जळगाव शहराला ‘महिला स्नेही शहर’ बनविण्यासाठी निधी फाऊंडेशन महानगरपालिकेसोबत सहकार्य करण्यास सदैव तयार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल निधी फाऊंडेशनतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. उच्चशिक्षित, खेळाडूवृत्ती आणि दूरदृष्टी असलेले महिला नेतृत्व जळगाव शहराला लाभले असून त्यांच्या कार्यकाळात शहराचा विकास होईल तसेच महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास फाऊंडेशनतर्फे अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी व्यक्त केला आहे.







