लग्नानंतरही प्रियकराकडून त्रास : पत्नीने पतीला सोबत घेत केली हत्या
Harassed by lover even after marriage : Wife kills husband along with him खापरखेडा (6 मार्च 2026) : लग्नापूर्वीचा प्रियकर वारंवार त्रास देत असल्याने पती व पत्नीने त्याची चाकूने वार करून नागरिकांसमोर भरदिवसा हत्या केली. ही धक्कादायक घटना खापरखेडा-कोराडी मंदिर मार्गालगत गुरुवार, 5 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. सागर वानखेडे (रा.येरला पावडे, ता.नरखेड) असे मृताचे नाव आहे. खून प्रकरणी राजू गजभिये व त्याची पत्नी सोनालीला अटक करण्यात आली.
काय आहे प्रकरण
दाम्पत्य वॉर्ड क्रमांक-2, खापरखेडा, ता. सावनेर येथील रहिवासी असून त्यांना दोन मुले आहेत. सागर हा राजूच्या पत्नीचा मामेभाऊ असून, दोघांनीही सोबत शिक्षण घेतल्याने त्यांचे आपसात प्रेमसंबंध होते. तिचा विवाह राजू गजभियेसोबत झाल्यानंतरही सागर तिच्या संपर्कात होता. होळी असल्याने सागर त्याच्या मूळ गावी येरला (पावडे) येथे आला होता. तो गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तिला भेटण्यासाठी खापरखेडा येथे आला होता.


पाठलाग करून प्रियकराला संपवले
तसा मेसेज त्याने तिला इन्स्टाग्रामवर पाठविला होता. वॉर्ड क्रमांक-2 मधील मंगल कार्यालयाजवळ ती सागरच्या मोटारसायकलवर मागे बसली आणि दोघेही खापरखेडा-कोराडी मंदिर मार्गावर आले. पती राजू मुलांना शाळेत सोडून दिल्यानंतर त्या दोघांच्या मागे आला. त्यानंतर पती-पत्नीने सागरवर चाकूने वार करून त्याची हत्या केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि सागरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठविला. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास कोराडी (ता. कामठी) पोलिसांकडे वर्ग केला.
पर्स उचलण्यासाठी दुचाकी थांबवली अन् केला खून
या मार्गावरील कोलार नदीवर असलेला पूल ओलांडताच विवाहितेने मुद्दाम पर्स खाली टाकली आणि पर्स उचलण्यासाठी सागरला मोटारसायकल थांबवायला लावली. तिने त्या पर्समध्ये घरून चाकू आणला होता. ती दुचाकीवरून खाली उतरली, पर्समधून चाकू काढून सागरवर वार केले. त्याच वेळी राजू तिथे पोहोचला व त्यानेही त्याच चाकूने त्याच्यावर चार वार केले. या मार्गाने येणारे-जाणारे हा प्रकार बघत होते. काहींनी याची मोबाइल फोनमध्ये व्हिडीओ क्लिप तयार केली. राजूच्या हातात चाकू असल्याने कुणीही मध्ये जाण्याचे धाडस केले नाही.
मुलांना जिवे मारण्याची धमकी
सागर आपल्या पत्नीला लग्नानंतर वारंवार त्रास देत असल्याची तक्रार राजूने खापरखेडा पोलिस ठाण्यात यापूर्वीच केली होती. ती काही दिवसांपूर्वी पुण्यात सागरकडे गेली होती. तेव्हा सागरने तिला दारूच्या नशेत मारहाण केली होती. तिने या घटनेची पुण्यातील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्यानंतरही दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. सागर तिच्यावर पुण्यात येण्यासाठी दबाव टाकत होता. त्यासाठी त्याने तिच्या दोन्ही मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.







