यावलला आठवडे बाजारातील राज्यमार्गाच्या कडेला लावलेली दुकाने हटवली
रस्त्याच्या कडेला दुकान लावल्यास पोलिसांकडून कारवाईचा इशारा
Shops set up along the state highway at Yavalla weekly market removed यावल (7 मार्च 2026) : यावल शहरात शुक्रवारच्या आठवडे बाजारात अंकेश्वर -बर्हाणपूर राज्य मार्गाच्या कडेला लावली जाणारी दुकाने पोलिसांनी हटवली आहे. रहदारीचा हा रस्ता मोकळा पाहिजे व या रस्त्याच्या कडेला जर कोणी पुन्हा दुकाने लावली तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. शुक्रवारच्या बाजाराच्या दिवशी अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गाने शहरातील या आठवड्या बाजार भागात मोकळा श्वास घेतला. पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
नागरिकांकडून कारवाईचे स्वागत
शहरातून अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्ग मार्गस्थ होतो. याच राज्य मार्गावर बुरुज चौकापासून ते थेट चोपडा नाक्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या दोन्ही कडेला विविध व्यावसायीक शुक्रवारच्या आठवडे बाजार निमित्ताने विविध दुकाने लावतात त्यामुळे या रहदारीच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होत होती. प्रसंगी अपघाताची भीती देखील निर्माण व्हायची. याबाबत अनेक तक्रारी झाल्या. यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी प्राधान्याने या तक्रारीची दखल घेतली व दर शुक्रवारी ते या रस्त्याच्या कडेला लागणारी दुकाने हटवत आहे. मात्र तरी देखील काही जणं दुकाने लावत होते. शुक्रवारी त्यांनी ट्राफिकचे हवालदार अर्शद गवळी, दिवाकर जोशी सह पोलीस पथकाला पाठवून या रस्त्याच्या कडेवरील लावण्यात आलेले सर्व दुकाने हटवली व रस्ता मोकळा केला आहे. त्याचप्रमाणे या रस्त्यावर जर कोणी पुन्हा कुठल्याही व्यावसायीकांनी दुकाने लावली तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. शुक्रवारचा आठवडे बाजाराच्या दिवशी या रस्त्याने मोकळा श्वास घेतलेला दिसुन आला. पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.


रस्त्याच्या कडेला दुकाने न लावण्याचे आवाहन
अंकलेश्वर-बर्हाणपूर हा वर्दळीचा राज्यमार्ग असूनही असे असतांना शहरातून मार्गस्थ होणार्या या राज्यमार्गाच्या कडेला अनेक व्यावसायीक शुक्रवारी आठवडे बाजाराचे दुकान लावत होते मात्र या व्यावसायिकांनी आता येथे दुकाने लावू नये त्यांच्या व्यवसायापेक्षा जनतेचे हित त्यांनी बघावे. रस्त्याच्या कडेला लावलेले दुकाने, रस्त्यावर उभे राहून ग्राहक त्यांच्याकडून काहीही खरेदी करत असतात यामुळे वाहतुकीस कोंडी निर्माण होते. प्रसंगी जर एखादी मोठी दुर्घटना घडली तर मोठी जीवित हानी या ठिकाणी होऊ शकते म्हणून आता रस्त्याच्या कडेला जर कोणी दुकान लावली तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिला आहे.







